दुर्मिळ योगायोग; पुढील ५ वर्षांत देशाचे ३ सरन्यायाधीश मराठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:50 AM2018-08-20T00:50:40+5:302018-08-20T06:49:11+5:30
सर्वोच्च न्यायालयावर नेमणुका करताना प्रादेशिक समतोलाचाही विचार केला जातो हे पाहता अल्पावधीत एकाच राज्याला सरन्यायाधीशपदाचा तिहेरी मान मिळणे हा दुर्मिळ योगायोग आहे.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई: पुढील पाच वर्षांत होणाऱ्या देशाच्या पाच सरन्यायाधीशांपैकी तिघे महाराष्ट्रतील असणार आहेत. न्या. शरद बोबडे, न्या. उदय लळित व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांना हा मान मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयावर नेमणुका करताना प्रादेशिक समतोलाचाही विचार केला जातो हे पाहता अल्पावधीत एकाच राज्याला सरन्यायाधीशपदाचा तिहेरी मान मिळणे हा दुर्मिळ योगायोग आहे.
गेल्या काही महिन्यांत न्या. इंदू मल्होत्रा, न्या. इंदिरा बॅनर्जी, न्या. विनित सरन व न्या. के. एम. जोसेफ यांच्या नेमणुकांमुळे सर्वोच्च न्यायालयात ३१ पैकी २५ न्यायाधीश झाले आहेत. त्यामुळे या सर्वांच्या वयाचा विचार करून पुढील पाच वर्षांत यापैकी कोण केव्हा सरन्यायाधीश होईल याचे गणित मांडणे सोपे झाले. एक-दोन अपवाद वगळता आजवर सरन्यायाधीशांची नेमणूक ज्येष्ठतेनुसारच होत आली आहे. नजिकच्या भविष्यातही त्यात खंड पडण्याचे काही कारण दिसत नाही. विद्यमान सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा ओरिसाचे आहेत. ते येत्या ३ आॅक्टोबर रोजी निवृत्त झाल्यावर मुळचे आसामचे असलेले न्या. रंजन गोगोई सरन्यायाधीश होतील व सुमारे १३ महिने म्हणजे पुढील वर्षाच्या १९ नोव्हेंबरपर्यंत ते त्या पदावर राहतील. त्यानंतर सन २०२४ पर्यंतच्या पाच वर्षांत जे चार सरन्यायाधीश होतील त्यापैकी तिघे मुळचे महाराष्ट्रातील असतील.
न्या. गोगोई यांच्यानंतर २३ एप्रिल २०२१ पर्यंत म्हणजे सुमारे अडीच वर्षे सरन्यायाधीशपदाच्या खुर्चीत न्या. शरद अरविंद बोबडे बसतील. ते नागपूरच्या पिढीजात कायदेपंडित घराण्यातील आहेत. त्यांचे दिवंगत वडील अरविंद बोबडे महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल होते. न्या. बोबडे यांचे बंधू विनोद बोबडे हेही ज्येष्ठ वकील आहेत. मुंबई उच्च न्यायालयावर १२ वर्षे न्यायाधीश राहिल्यावर मध्य प्रदेशमार्गे न्या. बोबडे पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयावर गेले आहेत.
यानंतर महाराष्ट्राला हा बहुमान पुन्हा आॅगस्ट २०२२ मध्ये न्या. उदय उमेश लळित यांच्या नियुक्तीने मिळेल. न्या. लळित यांचा सरन्यायाधीशपदाचा कालखंड २७ आॅगस्ट २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२ असा जेमतेम ७३ दिवसांचा असेल. मात्र थेट वकिलांमधून नेमलेला न्यायाधीश सरन्यायाधीश होण्याचा विरळा मान त्यांना मिळेल. मुळचे सोलापूरचे असलेल्या न्या. लळित यांनी मुंबईतून वकिली सुरु केली व नंतर ते सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील झाले. त्यांचे वडीलही नामांकित ज्येष्ठ वकील होते.न्या. लळित यांच्यानंतर न्या. धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश होतील. त्यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा पूर्ण दोन वर्षांचा असेल. अलिकडच्या काळातील सरन्यायाधीशांचा हा सर्वाधिक कार्यकाळ असेल. न्या. चंद्रचूड १३ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिल्यानंतर अलाहाबादमार्गे दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात आले आहेत. त्यांच्या सरन्यायाधीश होण्याचे इतिहास होईल. त्यांचे वडील दिवंगत न्या. यशवंत विष्णू चंद्रचूडही सरन्यायाधीश होते. पिता-पुत्राने एकच पद भूषविले, असे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच घडेल.
कॉलेजियममध्ये बहुमत
न्या. बोबडे यांच्यानंतर दीड वर्ष मुळचे आंध्र प्रदेशचे असलेले न्या. एन.व्ही रमणा यांना सरन्यायाधीशाचा हा बहुमान मिळेल. त्यांच्या कारकीर्दितही महाराष्ट्राचा बोलबाला असेल कारण त्यांच्या पाच न्यायाधीशांच्या कॉलेजियममध्ये न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. लळित, न्या. अजय खानविलकर व न्या. चंद्रजूड असे तब्बल चार न्यायाधीश मुळचे महाराष्ट्रातील असतील.