दिल्लीत दुर्मीळ कल्पवृक्ष
By admin | Published: March 23, 2017 12:55 AM2017-03-23T00:55:50+5:302017-03-23T00:55:50+5:30
कल्पवृक्षाचे आपण केवळ नाव ऐकून आहोत, परंतु दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात गेलात तर तुम्हाला हा वृक्ष पाहताही येईल.
नवी दिल्ली : कल्पवृक्षाचे आपण केवळ नाव ऐकून आहोत, परंतु दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात गेलात तर तुम्हाला हा वृक्ष पाहताही येईल. अनोख्या औषधीय गुणांमुळे या वृक्षाचे सर्वांनाच आकर्षण आहे. तथापि, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने त्याची ओळख लपविली आहे. लोकांनी या झाडाचे नुकसान करू नये, म्हणून असे करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्राचीन वृक्षाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची लोकांचीही जबाबदारी आहे. दिल्लीत तीन कल्पवृक्ष असून, त्यातील दोन प्राणिसंग्रहालयात आहेत. २००८ मधील एका सर्व्हेत त्यांचा छडा लागला होता. त्यानंतर, सर्व्हेवर आधारित पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हा येथे तीन कल्पवृक्ष होते. मात्र, त्यातील एक वाळला आहे. सर्व्हेनंतर या झाडांवर नावाची पाटी लावण्यात आली होती. मात्र, नंतर ती काढून टाकण्यात आली. ही झाडे कल्पवृक्ष असल्याचे कळताच लोकांनी त्यांची साल काढणे, पाने, फुले आणि फांद्या तोडणे सुरू केले. हे कमी म्हणून की काय, पूजापाठही सुरू झाले. झाडाचे नुकसान होत असल्याचे पाहून प्रशासनाने नावाची पाटी हटवून झाडाभोवती तारेचे कुंपण केले. लोकांनी झाडांचे नुकसान करू नये, म्हणून केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्यानंतर तारेचे कुंपण करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. या कल्पवृक्षापैकी एक वृक्ष गोरिलाच्या पिंजऱ्याजवळ असून, त्याला तारेचे कुंपण आहे. दुसरा कल्पवृक्ष जिराफाच्या पिंजऱ्यात असल्यामुळे काहीसा सुरक्षित आहे. येथून दररोज शेकडो लोक जातात, परंतु कोणाचेही आता या वृक्षांकडे लक्ष जात नाही. हिंदू संस्कृतीनुसार, कल्पवृक्ष समुद्रमंथनातून उत्पन्न झाला होता. हा पृथ्वीवर सर्वात जास्त वर्षे जगणाऱ्या वृक्षांपैकी एक आहे. याला बओबाब किंवा मंकी ब्रेड वृक्ष असेही म्हटले जाते. आफ्रिकेत हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, भारतात त्यांची संख्या खूप कमी आहे. दिल्लीशिवाय कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत ते तुरळक प्रमाणात आढळतात. तथापि, त्यांच्या लुप्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत.