दुर्मिळ शस्त्रक्रियेत दोन भाग जोडत बनले नवे यकृत
By admin | Published: September 28, 2015 02:49 AM2015-09-28T02:49:04+5:302015-09-28T02:49:04+5:30
कुटुंबातील दोन सदस्यांनी दान दिलेले यकृताचे दोन वेगवेगळे भाग जोडत ४६ वर्षीय रुग्णाला नवे यकृत देण्याची दुर्मिळ तेवढीच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
नवी दिल्ली : कुटुंबातील दोन सदस्यांनी दान दिलेले यकृताचे दोन वेगवेगळे भाग जोडत ४६ वर्षीय रुग्णाला नवे यकृत देण्याची दुर्मिळ तेवढीच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडण्याची किमया सर गंगाराम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पार पाडली.
यकृत अवयवदानाच्या या अनोख्या प्रयोगाने रुग्णाला नवे आयुष्यही लाभले आहे. प. बंगालचे रहिवासी समीर मित्रा हे गेल्या तीन वर्षांपासून ‘क्रिप्टोजेनिक सिरोसीस’ या आजाराने पीडित होते. हा त्रास वाढल्यानंतर त्यांनी अनेक रुग्णालयांत तपासण्या केल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाखेरीज पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. समीर यांचे वजन ९३ किलो असल्याने समस्या बिकट बनली होती. कारण योग्य यकृत मिळत नव्हते. कारण शरीराच्या वजनानुसार यकृताचा मेळ साधला जात नव्हता.सामान्य व्यक्तीचे यकृत त्याच्या वजनाच्या शरीराच्या तुलनेत केवळ दोन टक्के वजनाचे असते. प्रत्यारोपण करताना रुग्णाच्या एकूण वजनाच्या किमान ०.८ टक्के वजनाच्या यकृताची गरज असते. हे प्रमाण पाहता समीर यांना ७३० ग्रॅम वजनाचे यकृत हवे होते, असे ज्येष्ठ यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ. नैमीष मेहता यांनी सांगितले.
अडचणींवर मात
समीर यांच्या पत्नी आणि मुलांचे यकृत वजनाच्यादृष्टीने जुळून आले मात्र त्यांचा रक्तगट वेगळा होता. त्यामुळे ते अपात्र ठरले. त्यांचे एक मेहुणे यकृत द्यायला समोर आले पण त्यांना एकच किडनी असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या यकृताचा मोठा भाग घेण्याची जोखीम पत्करली नाही. मेहुण्याच्या पत्नीचा रक्तगट जुळून आला मात्र वजन केवळ ४५ किलोच होते. त्यांच्या यकृताचा उजवीकडील अर्धा भाग ५४० ग्रॅम वजनाचा होता.
उर्वरित २२० ग्रॅम वजनाचा भाग मेहुण्याच्या यकृतातून मिळविण्यात आला. यकृताचे दोन्ही भाग जोडत रक्तवाहिन्या जोडत कार्य सुरळीत करण्यात आले. दोन भाग जोडणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते, असे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ.शशांक पांडे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी सरकारच्या अधिकृत समितीकडून विशेष परवानगी घ्यावी लागली. २९ आॅगस्ट रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली. समीर यांना तीन आठवड्यानंतर सुटी देण्यात आली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. (वृत्तसंस्था)