पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेली महिला; दुर्मीळ स्टोन बेबी पाहून डॉक्टर चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 08:06 PM2021-07-29T20:06:38+5:302021-07-29T20:08:37+5:30
पोटदुखीची समस्या असलेल्या महिलेवर शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी पोटात आढळूलं स्टोन बेबी
रायपूर: छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात एक अतिशय दुर्मीळ घटना समोर आली आहे. एका महिलेला पोटदुखीचा आणि पोट सुजल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे महिला पंडित जवाहरलाल नेहरू स्मृती चिकित्सा महाविद्यालयाच्या प्रसूतीरोग विभागात दाखल झाली. डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरू केले. महिलेच्या पोटात दुर्मीळ लिथोरपेडियन आढळून आलं. त्याला स्टोन बेबीदेखील म्हटलं जातं.
प्रसूतीरोग विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योती जयस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि स्टोन बेबीला बाहेर काढण्यात आलं. या स्टोन बेबीचं वय सात महिने इतकं आहे. या अर्भकाला मृतावस्थेत बाहेर काढण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर महिलेची पोटदुखीची तक्रार थांबली. या महिलेला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. गर्भाशयाच्या बाहेर अर्भकाचा विकास होऊ लागल्यास त्याचं रुपांतर पुढे स्टोन बेबीमध्ये होतं, अशी माहिती डॉ. जयस्वाल यांनी दिली. अशा प्रकारच्या घटना अतिशय दुर्मिळ असल्याचं त्यांनी सांगितलं.
गर्भाशयाच्या बाहेर पोटात अर्भक वाढू लागल्यास लिथोपेडियन म्हणजेच स्टोन बेबी तयार होतं. गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होतो. मात्र गर्भाशयाच्या बाहेरील अर्भकाला रक्तपुरवठा होत नसल्यानं त्याचा मृत्यू होतो. अर्भकाला होणारा रक्तपुरवठा थांबल्यावर शरीर त्या अर्भकाचं रुपांतर दगडात करतं. स्टोन बेबी पोटात असल्यानं शारिरीक समस्या निर्माण होतात. अशा घटना अतिशय दुर्मिळ असतात.