‘आप’सात राडा!
By admin | Published: March 29, 2015 01:52 AM2015-03-29T01:52:13+5:302015-03-29T01:52:13+5:30
अरविंद केजरीवाल यांच्या ‘हुकूमशाही’विरुद्ध मोहीम उघडणारे आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक सदस्य योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची शनिवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली.
राष्ट्रीय कार्यकारिणीत धुमश्चक्री : गुंड आणल्याचा बंडखोरांचा आरोप
योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमधून हकालपट्टी
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या ‘हुकूमशाही’विरुद्ध मोहीम उघडणारे आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक सदस्य योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची शनिवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर बहुमताने ही कारवाई करण्यात आली. प्रचंड गदारोळात झालेल्या कार्यकारिणीत अक्षरश: राडा झाला. कारवाईच्या ठरावाला विरोध करणाऱ्यांना बैठकीत गुंडांकरवी मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे. आपल्याला हटविण्याचा हा निर्णय ‘लोकशाहीचा खून’ असल्याचे सांगणाऱ्या यादव आणि भूषण यांनी पक्षातच राहून लोकशाहीसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शनिवारी नवी दिल्लीत आयोजित ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप आणि प्रचंड गदारोळातच यादव, भूषण आणि त्यांचे समर्थक आनंद कुमार व अजित झा यांना हटविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने २४७ सदस्यांनी मतदान केले, तर १० सदस्य प्रस्तावाच्या विरोधात उभे राहिले. ५४ सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही, अशी माहिती ‘आप’चे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी दिली.
हा तर लोकशाहीचा खून - यादव
च्हा लोकशाहीचा खून आहे.
सर्वकाही आधीच ठरलेले होते आणि ठरल्यानुसारच झाले. ठराव मांडण्यात आला आणि काही मिनिटांतच मंजूर झाला. नियम धाब्यावर बसविण्यात आले, ही थट्टाच आहे, असे यादव म्हणाले.
च्केजरीवाल हे आम्हाला पक्षातून हाकलण्याची पूर्णतयारी करूनच आलेले होते. या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही, गुप्त मतदान झाले नाही.
च्सर्व काही केजरीवाल व त्यांच्या समर्थकांनी ठरविल्याप्रमाणे झाले. या बैठकीत योगेंद्र यादव जखमी झाले आहेत, असा आरोप भूषण यांनी केला.
केजरीवाल यांनी अनुचित मार्गाचा अवलंब केला. बैठकीत गुंड आणले आणि या गुंडांनी ठरावाला विरोध करणाऱ्या सदस्यांना मारहाण केली, असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना मारहाण करण्यात आली, असा खोटा प्रचार योगेंद्र यादव करीत आहेत. बैठकीत कुणालाही मारहाण वा धक्काबुक्की झालेली नाही. केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी हे कथानक रचण्यात आले आहे, असा आरोप आशुतोष यांनी टिष्ट्वटरवर केला आहे.
पक्षातूनच हाकलणार ?
परंतु शिस्तभंग कारवाईच्या माध्यमातून या दोघांनाही पक्षातून काढून टाकण्याच्या हालचाली केजरीवाल समर्थकांनी सुरू केल्या आहेत. या घडामोडींचे पडसाद राजकीय गोटात तातडीने उमटले आहेत. त्याचवेळी अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आणि मेधा पाटकर यांनी दिलेला राजीनामा यातून हा वाद चिघळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
आप आता निव्वळ एक ‘तमाशा’ बनून राहिली आहे. आजच्या बैठकीत भूषण व यादव यांच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी अहे. त्याची मी निंदा करते. असे प्रकार इतर राजकीय पक्षांमध्ये घडताना दिसत होते, तेच आपमध्ये घडणे अपेक्षित नव्हते. - मेधा पाटकर
मेधा पाटकर यांची ‘आप’ला सोडचिठ्ठी
आम आदमी पक्ष उभारणीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या हकालपट्टीचा निषेध नोंदवत मेधा पाटकर यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी दिली. पक्ष नेतृत्वावर टीका करीत पाटकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.