राष्ट्रपती भवनाच्या तत्परतेने नियोजित विवाह झाला सुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:09 AM2020-01-07T06:09:30+5:302020-01-07T06:09:37+5:30
पूर्वनियोजित विवाहाच्या कार्यक्रमात व्यत्यय येणार असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची तत्परतेने दखल घेत राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात थोडा बदल केल्याने हा विवाह आता ठरल्याप्रमाणे पार पडू शकणार आहे.
थिरुवनंतपूरम : नौदलाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कोची दौऱ्यामुळे त्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात होणा-या एका विदेशी दाम्पत्याच्या पूर्वनियोजित विवाहाच्या कार्यक्रमात व्यत्यय येणार असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची तत्परतेने दखल घेत राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात थोडा बदल केल्याने हा विवाह आता ठरल्याप्रमाणे पार पडू शकणार आहे.
कोची येथील ‘ताज विवांता’ या हॉटेलात विवाह करण्यासाठी मुद्दाम अमेरिकेहून आलेल्या अॅश्ले हॉल आणि राष्ट्रपती भवन यांनी गेल्या दोन दिवसांत परस्परांना उद्देशून केलेल्या टिष्ट्वट््सवरून हा हृदयस्पर्शी घटनाक्रम समोर आला आहे. राष्ट्रपती भवनाने रविवारी रात्री केलेल्या शेवटच्या टिष्ट्वटमध्ये, ‘तुमची अडचण दूर झाल्याने आनंद झाला’ असे हॉल यांना कळवत असताना राष्ट्रपती कोविंद यांच्यावतीने त्यांना विवाहानिमित्त शुभेच्छाही दिल्या.
अॅश्ले हॉल यांनी कोची येथील या हॉटेलात विवाह करण्याची आठ महिन्यांपासून तयारी केली होती. हा विवाह उद्या (मंगळवारी) सायंकाळी व्हायचा आहे. त्यासाठी त्या आणि त्यांचे ‘वºहाड’ ठरल्याप्रमाणे शनिवारी ‘ताज विवांता’ हॉटेलमध्ये पोहोचले. परंतु त्यांचा मोठा हिरमोड झाला. कारण, राष्ट्रपती कोविंद यांचाही कोची दौरा ठरला असून तेही विवाहाच्या दिवशी त्याच हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने गैरसोय होईल. त्यामुळे तुम्ही दुसरीकडे कुठेतरी सोय केल्यास बरे होईल, असे हॉटेल व्यवस्थापनाने अॅश्ले हॉल यांना सांगितले.
जेमतेम ४८ तासांच्या अवधीत विवाहाची व्यवस्था दुसरीकडे कशी करायची या विवंचनेने हताश झालेल्या अॅश्ले हॉल यांनी आपली अडचण टिष्ट्वटरवर व्यक्त केली. एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी हिच अडचण मांडून शक्य असल्यास काही मदत करावी, असे टिष्ट्वट राष्ट्रपती भवनास उद्देशून केले. सुरुवातीस राष्ट्रपती भवनाकडून त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु अडचण दूर झाल्याचे हॉटेलकडून त्यांना सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
>आता सारे ठरल्याप्रमाणे
राष्ट्रपती सोमवारी दुपारी कोचीमध्ये येऊन मंगळवारी सायंकाळी परत जाणार होते. या दोन दिवसांत सुरक्षा व्यवस्था असेल, अशी अडचण हॉटेल व्यवस्थापनाने सांगितली होती. परंतु हॉल यांच्या टिष्ट्वटची दखल घेऊन राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात थोडा बदल केला.
त्यानुसार राष्ट्रपती आता मंगळवारी सकाळीच कोचीहून रवाना होतील व त्यानंतर हॉल यांचा विवाह ठरल्याप्रमाणे थाटात पार पडू शकेल.