राष्ट्रपती भवनाचा मार्ग भाजपासाठी खडतर?
By admin | Published: October 11, 2016 06:11 AM2016-10-11T06:11:07+5:302016-10-11T06:11:07+5:30
राष्ट्रपतीपदावर हिंदुत्ववादी राजकीय व्यक्तीची वर्णी लावून इतिहास घडविण्याचा भाजपाचा मनसुबा असला, तरी भाजपा, संघ परिवारासाठी राष्ट्रपती भवनाची वाट खडतरच
हरीश गुप्ता / नवी दिल्ली
राष्ट्रपतीपदावर हिंदुत्ववादी राजकीय व्यक्तीची वर्णी लावून इतिहास घडविण्याचा भाजपाचा मनसुबा असला, तरी भाजपा, संघ परिवारासाठी राष्ट्रपती भवनाची वाट खडतरच दिसत आहे.
लोकसभेत संपूर्ण, तर राज्यसभेत कामचलाऊ बहुमत साध्य करणाऱ्या भाजपाची १४ राज्यांत सत्ता आहे. असे असले, तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक बहुमताच्या दृष्टीने भाजपाचे पारडे पुरेसे जड नाही. त्यामुळे २०१७ मधील राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण जिंकणार? याची कोणीही ठाम खात्री देऊ शकत नाही.
जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रणव मुखर्जी हे ल्युटन्स परिसरातील ३४ नंबरच्या बंगल्यात मुक्कामाला जाण्याची शक्यता आहे.. राष्ट्रपतीपदी त्यांची दुसऱ्यांदा वर्णी लागेल का, हे सांगणे घाईचे ठरेल. राज्यसभा व लोकसभा तसेच राज्यांतील विधानसभा सदस्यांच्या मतांचे मूल्य १०.९८ लाख असून, राष्ट्रपतीपदी निवडून येणाऱ्या उमेदवारास ५.४९ मूल्यांची लाख मते मिळविणे जरूरी असते; परंतु भाजपला २ टक्के मते कमी पडतात. त्यामुळे हा आकडा गाठण्यासाठी भाजपला उत्तर प्रदेशात होणारी विधानसभेची आगामी निवडणूक जिंकावी लागेल. संसदेतील एकूण ७७५ खासदारांपैकी भाजप आणि मित्रपक्षाला ४५० खासदारांचा पाठिंबा आहे. त्यानसुार भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला ३,१७,८९२ मते मिळू शकतील.
तथापि, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ यासारख्या मोठ्या राज्यांत भाजपचा फारसा जम नाही. एकूण ५.९८ लाख मतांपैकी उपरोक्त राज्यांतील मतांचा आकडा जवळपास ३ लाख आहे. त्यामुळे पारडे जड करण्यासाठी भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता कसोशीने प्रयत्न करावे लागतील. उत्तर प्रदेशमार्गे राष्ट्रपती भवनाचा मार्ग जातो. त्या राज्याकडे ८३ हजार मते आहेत. बिहार पराभवाने भाजपला हादराच बसला आहे. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्ष वगळून काँग्रेसचे संयुक्त उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसने उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांचे नाव पुढे केले आहे, असे कळते.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, करिया मुंडा, सुमित्रा महाजन, नजमा हेपतुल्ला यांच्यासह भाजपचे इतर नेते राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असले तरी या नेत्यांच्या विजयाची खात्री होईपर्यंत पंतप्रधान एकाही नेत्याला मैदानात उतरविण्याची जोखीम घेणार नाहीत. ते एकमताने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवतील. शिवाय उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करतील