मध्य प्रदेशात तिघांना गोहत्याप्रकरणी रासुका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:19 AM2019-02-06T05:19:26+5:302019-02-06T05:19:38+5:30
मध्यप्रदेशच्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील अशा खांडवा गावात गायीची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या तीन जणांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लावण्यात आला आहे.
भोपाळ : मध्यप्रदेशच्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील अशा खांडवा गावात गायीची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या तीन जणांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लावण्यात आला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यात अशी कारवाई प्रथमच झाली आहे.
मोघाट पोलिसांनी शुक्रवारी पहाटे राजू ऊर्फ नदीम आणि शकील यांना खरकाली खेड्यात अटक केली. त्यावेळी पळून गेलेल्या आझम या तिसऱ्या आरोपीला सोमवारी अटक केली. खांडवाचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी या आरोपींना रासुका लावण्यात आल्याचे सांगितले. मोघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहन सिंगोरे म्हणाले की, राजू हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर याआधी गोहत्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल झालेला आहे. गायीची हत्या झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतावस्थेतील कालवड जप्त केली. पळून जाण्याच्या प्रयत्नांतील नदीम व शकील यांना ताब्यात घेतले. (वृत्तसंस्था)