राजधानीत उंदराने घेतला प्रवाशाचा चावा, रेल्वे डॉक्टर म्हणतात हा तर फक्त ओरखडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 05:39 PM2018-01-09T17:39:18+5:302018-01-09T18:21:14+5:30
राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल प्रवास करत असताना उंदराने चावा घेतल्याचा दावा एका प्रवाशाने केला आहे.
मुंबई - राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल प्रवास करत असताना उंदराने चावा घेतल्याचा दावा एका प्रवाशाने केला आहे. ज्येष्ठ नागरिक असणा-या ब्रिजभूषण सूद 7 जानेवारीला प्रवास करत होते. रेल्वेत देण्यात येणा-या निकृष्ट दर्जाच्या जेवण आणि वैद्यकीय मदतीसाठी कर्मचा-यांनी केलेल्या दिरंगाईवरुन ब्रिजभूषण सूद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेन नागाडा रेल्वे स्थानकावर पोहोचण्याआधी उंदराने रात्री 11.40 वाजता ब्रिजभूषण सूद यांच्या कानाचा चावा घेतला. यामध्ये त्यांच्या कानाला गंभीर जखम झाली आहे.
ब्रिजभूषण सूद यांनी लगेच टीसीला यासंबंधी माहिती दिली होती. पण त्यावेळी त्यांना मदत मिळाली नाही. सूद यांनी सांगितल्यानुसार, 'रक्त वाहत असतानाही वैद्यकीय पथक आलं नव्हतं. रतलाम स्टेशन गेल्यानंतरही ते आले नाहीत. अखेर वडोदरा स्थानकात एक महिला डॉक्टर आली, पण ते नावापुरते आले होते. नागाडा ते वडोदरा दरम्यान तीन तासांच्या प्रवासात रक्त इतकं वाहत होतं की माझा हातरुमाल रक्ताने भरला होता'.
'महिला डॉक्टरने मला काही गोळ्या दिल्या पण मला ह्रदयाचा त्रास असल्याने काही साईड इफेक्ट होण्याची शक्यता होती. मी त्यांना तसं सांगितलं होतं. पण त्यांनी मला कोणत्या गोळ्या दिल्या जातायत यामध्ये लक्ष देणं महत्वाचं नाही समजलं. त्यांनी मला कोणतं इंजेक्शनही दिलं नाही, फक्त औषधं लिहून दिली आणि मुंबईत पोहोचल्यानंतर खरेदी करायला सांगितलं. माझी कोणतीही चूक नसताना मला 500 रुपयांचं बिल सोपवण्यात आलं', असं ब्रिजभूषण सूद यांनी सांगितलं.
ब्रिजभूषण सूद एका खासगी कंपनीत सीनिअर सेल मॅनेजर आहेत. 'एका मित्राने मला ग्रांट रोड येथील डॉक्टरकडे नेलं. त्यांनी इन्फेक्शन होऊ नये यासाठी मला इंजेक्शन दिलं. मी नेहमी राजधानीने प्रवास करतो आणि तिथे उंदिरं फिरणं काही नवं नाही. पण पहिल्यांदा मला त्यांचा त्रास झाला', असं ब्रिजभूषण सूद बोलले आहेत.
रेल्वे डॉक्टरांनी कोणताही उंदीर चावला नसून तो फक्त ओरखडा असल्याचा दावा केला आहे. उशीवरही रक्ताचे कोणते डाग नव्हते. अंधार असल्या कारणाने मी रक्ताने माखलेला माझा रुमाल शोधू शकलो नाही असं ब्रिजभूषण सूद यांचं म्हणणं आहे.
पश्चिम रेल्वेच चीफ पीआरओ रविंदर भाकर यांनी सांगितल्यानुसार, '5 जानेवारीला ट्रेनमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. सर्व काळजी घेण्यात आली होती'.