Ratan Tata: रतन टाटा भावूक झाले, एकटेपणा अन् म्हातारपणाचे दु:खच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 09:30 AM2022-08-17T09:30:24+5:302022-08-17T09:31:24+5:30

सहवेदनेची जाणीव आणि भावना या निकषांवर अत्यंत सखोल पारख करून निवडलेल्या तरुण, सुशिक्षित पदवीधरांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना खरीखुरी, अर्थपूर्ण सोबत मिळवून देणे हा 'गुडफेलोज'चा मूळ उद्देश असणार आहे.

Ratan Tata: Ratan Tata became emotional on occasion of app launching, lamenting loneliness and old age | Ratan Tata: रतन टाटा भावूक झाले, एकटेपणा अन् म्हातारपणाचे दु:खच सांगितले

Ratan Tata: रतन टाटा भावूक झाले, एकटेपणा अन् म्हातारपणाचे दु:खच सांगितले

googlenewsNext

मुंबई - प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या उपस्थितीत मंगळवारी 'गुडफेलोज' नावाचे स्टार्ट-अप लाँच करण्यात आले. वयस्क मंडळींना एक अर्थपूर्ण कम्पॅनियनशीप देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या नव्या कल्पनेच्या स्टार्ट-अपला रतन टाटा यांनी अर्थसहाय्य देऊन त्यात गुंतवणूकही केली. या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना रतन टाटा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. रतन टाटांनी एकटेपणाचं दु:ख आणि वेदना बोलून दाखवल्या, तुम्ही जेव्हा म्हातारे होता तेव्हा कसं वाटतं, असे म्हणत एकटेपणावर भाष्य केलं. 

सहवेदनेची जाणीव आणि भावना या निकषांवर अत्यंत सखोल पारख करून निवडलेल्या तरुण, सुशिक्षित पदवीधरांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना खरीखुरी, अर्थपूर्ण सोबत मिळवून देणे हा 'गुडफेलोज'चा मूळ उद्देश असणार आहे. या स्टार्टअपमधील वृद्धांना ग्रँडपाल्स म्हंटलं जाणार आहे. अभिनेत्री श्रिया पिळगांवकर, कन्टेन्ट क्रिएटर विराज घेलानी यांनी आपल्या आजी-आजोबांसोबत आणि या सेवेसाठी नावनोंदणी केलेल्या विद्यमान ‘ग्रॅण्डपाल्स’च्या साथीने उद्घाटनाचा हा सोहळा साजरा केला.  

यावेळी बोलताना रतन टाटा म्हणाले, एकटं राहणं हे कसं असतं, हे तुम्हाला माहिती नाही, जोपर्यंत तुम्हाला एकट्याने वेळ घालवायची वेळ येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ती वेदना समजणार नाही. वास्तवात जोपर्यंत तुम्ही म्हातारे होणार नाहीत, तोपर्यंत कुणीही म्हातारे व्हावे, असं तुम्हालाही वाटणार नाही, असे म्हणत रतन टाटा यांनी म्हातारपणाची आणि एकटेपणाची वेदना बोलून दाखवली. तसेच, "गुडफेलोजने दोन पिढ्यांमध्ये निर्माण केलेला स्नेहबंध अतिशय अर्थपूर्ण आहे आणि भारतातील एक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधण्यास त्यामुळे मदत होत आहे. या गुंतवणुकीमुळे गुडफेलोजची युवा टीम आणखी विस्तारण्यास मदत होईल अशी मला आशा आहे.“, असेही ते म्हणाले

अशी मिळवा गुडफेलोजची सेवा

गेल्या सहा महिन्यांत प्रायोगिक तत्वावर या कल्पनेची चाचपणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, 'गुडफेलोज' आता मुंबई आणि पुणे येथे लाँच करण्यात आले आहे. तसेच चेन्नई आणि बेंगळुरू या शहरात याची शाखा प्रस्थापित करणे हे त्यांचे पुढील लक्ष्य असणार आहे. याशिवाय, एका प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार, 'गुडफेलोज'ला प्रायोगिक टप्प्यात तरुण पदवीधरांकडून ८००हून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी निवडण्यात आलेल्या २० जणांच्या तुकडीने मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना सोबत दिली. ज्येष्ठ नागरिकांना thegoodfellows.in येथे साइन-अप करून किंवा ८७७९५२४३०७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ही सेवा मिळविता येईल.

गुडफेलोजबद्दल सविस्तर...

'गुडफेलोज'द्वारे एखादे नातवंड आपल्या आजी-आजोबांसाठी जे करेल त्या पद्धतीच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. भारतामध्ये जवळ-जवळ दीड कोटी ज्येष्ठ नागरिक जोडीदार गमावल्याने किंवा नोकरीच्या गरजेपोटी कुटुंबपासून दूर आहेत. अशा लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन सेवा असतात. पण त्यांच्या मानसिक गरजा, त्यांचा एकटेपणा समजून घेणारं असं कोणीतरी असावं, या कल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला गेला आहे. याशिवाय गुडफेलोजतर्फे दर महिन्याला काही मासिक उपक्रमही आयोजित केले जातील. जिथे 'ग्रॅण्डपाल्स'ना आपल्या 'गुडफेलोज'सह सहभागी होता येईल. त्यामुळे ग्रॅण्डपाल्सना एकमेकांना तसेच इतरही युवा पदवीधरांना भेटता येईल व त्यातून आपण एका समुदायाचा भाग असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल. 'गुडफेलोज'ची व्यवसाय पद्धती प्रिमीयम सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित आहे. पहिल्या महिन्याची सेवा नि:शुल्क असेल. या कालावधीमध्ये ग्रॅण्डपाल्सना ही सेवा अनुभवता यावी इतकेच त्यामागचे लक्ष्य आहे, कारण प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय ही संकल्पना लक्षात येणे कठीण आहे. दुस-या महिन्यापासून लहानसे सदस्यत्व शुल्क आकारण्यात येईल. पेन्शनधारकांच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन हे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

हे शुल्क दोन महत्त्वाच्या कारणांसाठी आकाराले जात आहे. 'गुडफेलोज'ची (पदवीधर) आर्थिक सुरक्षितता जपणे आणि त्यांचा मान राखला जावा व हा व्यवसाय निवडण्याचा सुयोग्य मोबदला त्यांना देता यासाठी ही सेवा सशुल्क ठेवण्यात आली आहे. यामुळे निवडलेले गुडफेलोज टिकून राहतील आणि त्यांना चांगल्या प्रकारे तयार करता येईल व समाजऋण फेडताना त्यांना आपली कारकिर्दही घडवता येईल. या सेवेच्या सबस्क्रिप्शन मॉडेलनुसार ज्येष्ठांचे गुडफेलोजबरोबरचे स्नेहबंध तयार होत असताना त्यांना भेटायला येणारी व्यक्ती आमच्याकडून सतत बदलली जाणार नाही याची हमी दिली जाते, कारण सतत वेगवेगळ्या व्यक्ती भेटत राहिल्यास अस्सल आणि खरेखुरे नाते तयार होण्यासाठी आवश्यक वेळ आणि भावनिक अवधान मिळू शकत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला मित्र बनवतो तेव्हा तीच व्यक्ती आपल्याला वारंवार भेटावी अशी आपली इच्छा असते. दरवेळी नवीन व्यक्ती भेटल्यास हे घडणार नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
 

Web Title: Ratan Tata: Ratan Tata became emotional on occasion of app launching, lamenting loneliness and old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.