देशात असहिष्णुतेचे परिणाम पाहतोय- रतन टाटा
By admin | Published: October 23, 2016 09:11 AM2016-10-23T09:11:38+5:302016-10-23T09:20:12+5:30
उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला
ऑनलाइन लोकमत
मध्य प्रदेश, दि. 23 - गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाढत्या असहिष्णू वृत्तीच्या विरोधात आक्रोश होत असतानाच नामचीन उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत काही महिन्यांपूर्वी अनेक राजकीय नेते आणि साहित्यिकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता खुद्द रतन टाटांनीच अहिष्णुतेवर चिंता व्यक्त केल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे.
ते म्हणाले "असहिष्णुता एक शाप आहे, गेल्या काही दिवसांपासून असहिष्णुतेचे परिणाम पाहतो आहोत. देशातील प्रत्येक व्यक्तीला असहिष्णुता कुठून येते आणि काय आहे, हे माहीत आहे. देशातील हजारो-लाखो लोकांमधील प्रत्येकाला असहिष्णुतेपासून मुक्तता हवी आहे. मध्य प्रदेशमधील सिंधिया स्कूलच्या 119व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी असहिष्णुतेबाबत आपलं मत व्यक्त केल्यानंतर रतन टाटांनी कार्यक्रमाला संबोधित करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मताचं समर्थन केलं.
"आपल्याला देशात प्रेम आणि आपुलकीचं वातावरण निर्माण करायला हवं. कुणालाही हाणामारी न करता प्रत्येकाशी चांगली देवण-घेवाण करत सौदार्हपूर्ण वातावरणात टिकवून ठेवण्याची गरज आहे". यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना टाटा म्हणाले, "मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यानं यशस्वी व्हावं. तसेच विचारवंतही बनावं. चर्चा, वादविवाद, विश्लेषण आणि असहमती ही सगळी सभ्य समाजाची लक्षणं समजली जातात". आमिर खानच्या सहिष्णुतेच्या वक्तव्यावरून मोठं वादंग उठलं होतं. आता रतन टाटांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.