बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८९ टक्के, ६९ लाख लोक ठणठणीत; ७ लाखांपेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 04:45 AM2020-10-24T04:45:46+5:302020-10-24T07:04:13+5:30
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७७,६१,३१२, तर बरे झालेल्यांचा आकडा ६९,४८,४९७ वर पोहोचला आहे. शुक्रवारी कोरोनाचे ५४,३६६ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आणखी ६९० जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,१७,३०६ झाली आहे.
नवी दिल्ली : देशामध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता ७ लाखांपेक्षा कमी झाली आहे. सलग पाचव्या दिवशी शुक्रवारी कोरोनाचे ६० हजारांहून कमी नवे रुग्ण आढळले असून, या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ७७ लाख ६१ हजारांवर पोहोचली आहे, तर ६९ लाख लोक या संसर्गातून बरे झाले आहेत.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७७,६१,३१२, तर बरे झालेल्यांचा आकडा ६९,४८,४९७ वर पोहोचला आहे. शुक्रवारी कोरोनाचे ५४,३६६ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आणखी ६९० जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,१७,३०६ झाली आहे. सध्या ६,९५,५०९ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ८.९६ टक्के आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत ८९.५३ टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर १.५१ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने सांगितले की, २२ ऑक्टोबर रोजी १४,४२,७२२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता १०,०१,१३,०८५ इतकी झाली आहे.
३८ कोटी लोकांना कोरोना झाल्याची शक्यता
भारतामध्ये आतापर्यंत ३८ कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली असण्याची शक्यता आहे असा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. यासंदर्भातील लेख इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयजेएमआर)च्या अंकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यासाठी संशयित रुग्ण-लक्षणे जाणवत नसलेले-बाधा झालेले-बरे झालेले (एसएआयआर) अशा चार प्रकारांचे प्रारूप वापरून हा अभ्यास करण्यात आला अशी माहिती संशोधक माधुरी कानिटकर व एम. विद्यासागर यांनी या लेखात दिली आहे.