अधिकाऱ्यांनी कामात तत्परता न दाखवल्यास बरखास्त करणार : राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 04:19 AM2018-05-01T04:19:30+5:302018-05-01T04:19:30+5:30
क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी अधिका-यांनी जर खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यास उशीर लावला तर त्यांना बरखास्त केले जाईल, असा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी अधिका-यांनी जर खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यास उशीर लावला तर त्यांना बरखास्त केले जाईल, असा इशारा दिला आहे.
येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्यांच्या सन्मान सोहळ्यात राठोड म्हणाले, ‘‘भारतीय खेळांसाठी पैशांची कोणतीही कमतरता नाही; परंतु खेळाडू आणि महासंघाने त्याचा उपयोग योग्य उद्देशासाठी करायला हवा. क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडे आवश्यकता आणि समस्या लवकरात लवकर सोडवण्याची जबाबदारी सोपवली आहे. खेळाडूंना योग्य वेळी प्रोत्साहन रक्कम अथवा निधी मिळण्यास अडचण होत असेल, तर काही अधिकाºयांना बरखास्त केले जाऊ शकते; परंतु खेळाडूंनी आरोप लावण्याआधी चुकाही आमच्याकडून आहे, की त्यांच्याकडून, हे निश्चित करावे. एका अधिकाºयाला आपण निलंबित करणारच होतो, तेव्हा त्यानंतर खेळाडूला एका वर्षाआधीच रक्कम दिली गेली असल्याचे कळले होते.’’
भारताने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्यपदकांसह एकूण ६६ पदकांची कमाई केली. राठोड यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या उपस्थितीत पदकविजेत्यांना प्रोत्साहन रक्कम दिली. एमसी मेरी कोम, सुशील कुमार, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, मीराबाई चानू, नीरज चोपडा, मनू भाकर, अनिष भानवाला आणि जीतू राय, तेजस्विनी सावंत, राहुल आवारेसह अनेक आघाडीचे खेळाडू या वेळी उपस्थित होते. वैयक्तिक सुवर्णपदकविजेत्यांना प्रत्येकी ३० लाख रुपये, तर रौप्य आणि कांस्यपदकविजेत्यांना अनुक्रमे २० व १० लाख रुपये देण्यात आले. सांघिक स्पर्धेतील विविध खेळांच्या खेळाडूंना वेगवेगळी रक्कम देण्यात आली.
रोख पारितोषिक वितरणानंतर सर्व खेळाडूंनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सविता कोविंद यांची भेट घेतली. या वेळी या दोघांनी खेळाडूंचे कौतुक केले. तत्पूर्वी, सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा भेट घेतली. या वेळी मोदी यांनी खेळाडूंचे कौतुक तर केलेच, पण आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक खेळाच्या खेळाडूंबरोबर मोदींनी छायाचित्र काढले.