Ration Card: देशातील 10 लाख लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार, मोफत धान्य मिळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:38 PM2022-11-08T13:38:29+5:302022-11-08T13:38:42+5:30
Ration Card: देशभरात 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत रेशन मिळत आहे.
Free Ration card : सध्या देशभरातील कोट्यवधी लोक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत. मात्र, आता सरकार लाखो लोकांचे रेशन बंद करणार आहे. जे लोक सरकारी रेशनचा खोट्या मार्गाने फायदा घेत आहेत, अशा देशभरातील 10 लाख बनावट शिधापत्रिका रद्द होणार आहेत. अशा बनावट मार्गाने धान्य घेणाऱ्या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, ज्यांची शिधापत्रिका बनावट असेल, त्यांच्याकडून सरकार रेशन वसूल करेल.
देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्र नसलेले करोडो लोकही देशात आहेत. असे असतानाही ते वर्षानुवर्षे मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. अलीकडेच, सरकारने 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे. ज्यांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार नाही.
अपात्र शिधापत्रिकाधारकांची यादी शिधावाटप विक्रेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेशन विक्रेते नावे चिन्हांकित करतील आणि अशा कार्डधारकांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर त्यांची कार्डे रद्द केली जातील. जे लोक मोफत रेशन मिळण्यास पात्र आहेत त्यांनाच रेशन मिळेल.
या लोकांची ओळख पटली आहे
NFSA नुसार जे कार्डधारक आयकर भरतात, याशिवाय ज्यांच्याकडे 10 बिघापेक्षा जास्त जमीन आहे. अशा लोकांची यादीही तयार केली जात आहे. त्याचबरोबर अशा लोकांचाही शिधापत्रिका रद्द करणाऱ्यांमध्ये समावेश आहे, ज्यांनी गेल्या 4 महिन्यात मोफत रेशन घेतलेले नाही. त्याचबरोबर काही लोक असे आहेत, जे मोफत रेशनचा व्यवसाय करतात. अशा लोकांचीही ओळख पटली आहे. बनावट मार्गाने शिधापत्रिका वापरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या यूपीमध्ये समोर आली आहे. मात्र, तरीही शिधापत्रिकाधारकांची पात्रता तपासण्याचे काम सुरू आहे.