बापरे! रुग्णवाहिका आली नाही तर कुटुंबाने गर्भवतीला नेलं बाईकवरून; रस्त्यातच झाली डिलिव्हरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 04:36 PM2022-09-26T16:36:34+5:302022-09-26T16:41:38+5:30
खूप तास थांबूनही रुग्णवाहिका गावात न पोहोचल्याने कुटुंबीयांनी गर्भवतीला बाईकवरून आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात नेत असताना महिलेला खूप वेदना झाल्या आणि वाटेतच तिने एका मुलीला जन्म दिला.
मध्य प्रदेशातील अनेक खेड्यांमध्ये आरोग्यसेवेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. रतलामच्या आदिवासी भागातील गावात एका गर्भवतीला प्रसूती वेदना होत होत्या. कुटुंबीयांनी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेची गरज असल्याचं सांगितलं. तसेच खूप तास थांबूनही रुग्णवाहिका गावात न पोहोचल्याने कुटुंबीयांनी गर्भवतीला बाईकवरून आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात नेत असताना महिलेला खूप वेदना झाल्या आणि वाटेतच तिने एका मुलीला जन्म दिला.
हे प्रकरण सैलाना विधानसभा मतदारसंघातील बर्डा पंचायतीच्या बयोटेक गावातील आहे. रुग्णवाहिका न आल्याने रस्त्यातच मुलीचा जन्म झाल्याची माहिती मिळताच सैलाना ब्लॉक वैद्यकीय अधिकारी जितेंद्र रॅकवार यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठले. महिला व नवजात मुलीला सैलाना आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. ब्लॉक मेडिकल ऑफिसर यांनी या परिस्थितीसाठी रस्ता नसल्याचे सांगून मोबाईल नेटवर्कच्या समस्येबाबतही बोलले.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्डा पंचायतीच्या बयोटेक गावात राहणाऱ्या देवीलाल यांच्या पत्नीला रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास प्रसूती वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला माहिती दिली. मात्र खूप वेळ वाट पाहूनही रुग्णवाहिका घटनास्थळी न पोहोचल्याने गरोदर संगीताला मोटारसायकलवर बसवून कुटुंबीय शिवगडकडे रवाना झाले. शिवगडला जाताना प्रसूती वेदना झाल्या आणि वाटेतच संगीता यांनी एका मुलीला जन्म दिला. तेथेही ही महिला आणि नवजात अर्भक सुमारे तासभर वाटेतच पडून होते, तरीही रुग्णवाहिका त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यानंतर कुटुंबीय महिलेला घेऊन त्यांच्या घरी परतले.
माहिती मिळताच सैलाना बीएमओ डॉ जितेंद्र रॅकवार यांनी रुग्णवाहिका घेऊन गावात पोहोचून आई व बाळाला सैलाना आरोग्य केंद्रात नेले. बीएमओ डॉ जितेंद्र यांनी सांगितले की, गावात रस्ता नसल्याने रुग्णवाहिका तेथे नेण्यात अडचण येत आहे. गावात मोबाईल नेटवर्कची समस्या पहिल्यापासून आहे. त्यामुळे कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात खूप अडचणी येत आहेत. सीएमओ डॉ. प्रभाकर ननावरे यांनी यासंदर्भात सांगितले की, महिला व बालकाच्या आरोग्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा प्रकार 108 रुग्णवाहिकेचा असून, याप्रकरणी गांभीर्य दाखविण्यात येत आहे. कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.