उंदीर, मुंग्यांनी फस्त केले एक्स रे मशिन! रुग्णालयातील डॉक्टरांनी आमदारांना दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 06:00 AM2021-12-24T06:00:25+5:302021-12-24T06:00:52+5:30
या उंदरांना व मुंग्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदाराने म्हटले आहे.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : मुंग्या गूळ वा साखर खातात, अन्नधान्यांचा फडशा उंदीर पाडतात, हे आपणाला माहीत आहे. पण उंदीर व मुंग्या यांनी मिळून चक्क एक एक्स रे मशिनच खाल्ल्याची माहिती डॉक्टरांनी आमदारांना दिली, तेव्हा ते बुचकळ्यातच पडले. मशिनचा वापर होण्यापूर्वीच उंदीर व मुंग्यांनी त्याचा फडशा पाडला.
बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील मखदुमपूर येथील रुग्णालयात स्थानिक आमदार सतीश कुमार गेले होते. तेथील एक्स रे मशिन १५ ऑगस्टपासून सुरू होणे अपेक्षित होते; पण त्यांना ते मशिनच दिसेना. त्यामुळे त्यांनी मशिन कुठे ठेवली आहे, याची चौकशी केली. त्यावर त्यांना डॉक्टरांनी सांगितले की मुंग्या व उंदरांनी ती खाल्ली. त्या मशिनची किंमत तब्बल २२ लाख रुपये होती.
आमदार सतीश कुमार यांनी कंत्राटदाराकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, आम्ही दिलेले एक्स रे मशिन व्यवस्थित होते; पण ते सुरू होण्याआधीच उंदीर व मुंग्यांनी ते खाल्ले असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. दुसरे यंत्र काही काळाने पाठवण्यात येईल.
ताबडतोब अटक करा
- बिहारमधील उंदीर पूर्वी पोलीस ठाण्यात दारू प्यायचे. ते आता रुग्णालयात जातात, एक्स रे मशिन खातात. त्यांना मुंग्याही साथ देतात.
- त्यामुळे या उंदरांना व मुंग्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे करणार आहोत, असे सतीश कुमार म्हणाले.
- जोपर्यंत मुंग्या व उंदीर यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.