उंदरांनी फस्त केला तब्बल 60 लाखांचा गांजा, पोलिसांचा अजब दावा; न्यायाधीश म्हणाले, पुरावा द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 01:48 PM2022-11-26T13:48:14+5:302022-11-26T13:49:06+5:30
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एनडीपीएस कायद्याअन्वये हा गांजा जप्त करण्यात आला होता.
मथुरा : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे एक अजब घटना घडली आहे. जप्त केलेला व पोलिस ठाण्याच्या गोदामात ठेवलेला ५८६ किलो गांजा उंदरांनी फस्त केल्याचा अहवाल पोलिसांनीन्यायालयाला सादर केला आहे. या गांजाची किंमत ६० लाख रुपये आहे. पोलिसांच्या या अहवालाने न्यायाधीशही अचंबित झाले आहेत. गांजा उंदरांनीच फस्त केला याचे पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एनडीपीएस कायद्याअन्वये हा गांजा जप्त करण्यात आला होता. पोलिस ठाण्याच्या गोदामात गोणीत भरून ठेवलेला गांजा उंदरांनी खाऊन टाकला, असे पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सप्तम यांना सांगितले. त्यावर गांजा उंदरांनीच खाल्ला, याचे सबळ पुरावे उद्या, शनिवारी न्यायालयात सादर करा, असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.
उंदरांचा बंदोबस्त करण्याचा आदेश -
- पोलिस ठाण्यात उंदरांनी उच्छाद मांडला असेल तर त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करा, असाही आदेश न्यायाधीश सप्तम यांनी पोलिसांना दिला. उंदीर किंवा आणखी कोणत्याही कारणांमुळे अमली पदार्थ प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा नष्ट होत असेल तर ते फारच गंभीर आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
- त्यावर जप्त केलेला गांजाचा सर्व साठा आता न्यायालयासमोर हजर करणे शक्य नाही. जो उरलासुरलेला गांजा आहे तो पुराव्यादाखल सादर करता येईल, असे सांगत पोलिसांनी न्यायालयासमोर हतबलता व्यक्त केली.
असा मारला उंदरांनी डल्ला -
२०१८ साली दोन प्रकरणांत पोलिसांनी शेरगड व आणखी एका ठिकाणाहून गांजाचा मोठा साठा जप्त केला होता. मथुराच्या पोलिस ठाण्यातील गोदामामध्ये छतातून पाण्याची गळती होत असून, तिथे पावसाचे पाणी आत शिरते. त्यामुळे या गोदामात ठेवलेली गोणी भिजली. तेथील उंदरांनी ही गोणी कुरतडून त्यातील गांजा खाल्ला, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.