'रामलीला'मध्ये हनुमानानंतर आता रावणाची भूमिका करणाऱ्याचा मंचावरच अचानक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:05 PM2022-10-04T12:05:59+5:302022-10-04T12:07:41+5:30
पतिराम गेल्या अनेक वर्षापासून रामलीलामध्ये रावणाची भूमिका सादर करत होते
अयोध्या - उत्तर प्रदेशातील विविध विविध जिल्ह्यात 'रामलीला' सादरीकरणावेळी भूमिका करणाऱ्या कलाकारांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. फतेहपूर इथं हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीचं अचानक आलेल्या ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अयोध्येत रावणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त केला जात आहे.
अयोध्याच्या ऐहर गावात रविवारी रात्री रामलीला सुरू होती. याठिकाणी ६० वर्षीय पतिराम हे रावणाची भूमिका साकारत होते. सीतेचं अपहरण करतानाचं दृश्य साकारत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. कुणी काहीही करण्याआधीच ते खाली कोसळले. रामलीला सादरीकरण तात्काळ थांबवण्यात आले. पतिराम यांना हॉस्पिटलला घेऊन गेले. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गावचे सरपंच पुनीत साहू यांनी माध्यमांना सांगितले की, पतिराम गेल्या अनेक वर्षापासून रामलीलामध्ये रावणाची भूमिका सादर करत होते. त्यांच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या मागे पत्नी देवमती, २ मुले आणि २ मुली असा परिवार आहे. एका मुलीचे लग्न झाले आहे. पतिराम यांच्या अचानक एक्झिटनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. गावात शोककळा पसरली आहे असं त्यांनी म्हटलं.
असाच प्रकार फतेहपूरच्या सलेमपूर गावात घडला. व्यासपीठावर राम कथा सादर करण्यात येत होती. त्यात लंका दहनाचं दृश्य सुरू होतं. तेव्हा हनुमानाची भूमिका करणारा कलाकार अचानक खाली कोसळला त्याचा जागीच मृत्यू झाला. मंचावरील इतरांनी कोसळलेल्या कलाकाराला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. सलेमपूर गावातील रामसरुप हनुमानाची भूमिका साकारणारे मंचावर कोसळले.
मिळालेल्या माहितीनुसार, रामसरुप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईक म्हणाले की, रामसरुप हे फेरिवाले असून त्यातून ते कुटुंबाचा सांभाळ करतात. देवीच्या जागरणावेळी दरवर्षी ते रामकथेत भाग घेतात. लोकांच्या आस्थेपायी ते हनुमानाची भूमिका साकारतात. मात्र तीच भूमिका साकारताना अचानक ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत.