बुरोंडी जेटीचा प्रश्न मार्गी लावणार : रवींद्र चव्हाण
By admin | Published: July 13, 2017 04:36 PM2017-07-13T16:36:17+5:302017-07-13T16:36:17+5:30
किनारपट्टी परिसराची केली प्रत्यक्ष पाहणी
आॅनलाईन लोकमत
दापोली (जि. रत्नागिरी), दि. १३ : जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारी बंदर अशी ओळख असणाऱ्या बंदरात मच्छीमारी जेटीची उभारणी करावी, अशी मागणी गेली ४० वर्षे मच्छिमार बांधव करीत आहेत. परंतु आजपर्यंत केवळ आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. मात्र, राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी बंदराची पाहणी करून जेटीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच जेटी होईल, या आशेवर मच्छीमार आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बॅकवॉटर तयार करून जेटीचा विषय मार्गी लावू. त्याशिवाय जेटी उभारता येणे अशक्य आहे. मात्र, ती उभारण्यासाठी काय करावे लागेल? याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक होईल, असे यावेळी चव्हाण म्हणाले.
यावेळी चव्हाण म्हणाले की, आपण या बुरोंडी किनारपट्टी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीमध्ये सखोल चौकशी करून त्यावर अभ्यासपूर्ण निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. आपण यात स्वत: लक्ष घालून स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या बुरोंडी बंदर जेटीचे काम लवकारात लवकर मार्गी लावू, असे ठोस आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत स्मिता जावकर, उदय जावकर, अजय साळवी, मुश्ताक दरवेश, बावा केळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांची बुरोंडी भंडारी समाजाचे अध्यक्ष सुहास हेदुकर, संदीप शेवडे, अशोक बागकर, नवरंग बागकर, श्रीराम बागकर यांनी भेट घेतली.