Gujarat Election 2022: "अभी भी टाइम है समझ जाओ...", बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करून जडेजाने घातली भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 08:01 PM2022-11-30T20:01:00+5:302022-11-30T20:02:58+5:30
रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करून गुजरातच्या जनतेला केले भावनिक आवाहन केले आहे.
जामनगर : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी गुजरात विधानसभेच्या रिंगणात आहेत. रिवाबा जडेजा या गुजरातमधील जामनगर येथून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे पत्नीच्या प्रचारासाठी जडेजा मैदानात उतरला आहे. खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी जामनगरमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. जडेजाने विविध माध्यमातून आपल्या पत्नीला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच त्याने आता बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करून गुजरातच्या जनतेला भावनिक आवाहन केले आहे.
जडेजाने घातली भावनिक साद
दरम्यान, रवींद्र जडेजाने बाळासाहेबांच्या भाषणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, "माझे म्हणणे एवढेच आहे की जर तुम्ही नरेंद्र मोदीला बाजूला केले तर गुजरात तुमचा गेला. हे माझे वाक्य मी अडवाणींपाशी बोललेलो आहे." रवींद्र जडेजाने बाळासाहेबांचा हा जुना व्हिडीओ शेअर करून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Abhi bhi time hai samaj jao gujaratiyo🙏🏻 #respect#balasahebthackeraypic.twitter.com/bwjO3Jj7iq
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 30, 2022
रिवाबा यांच्यासाठी मोठ्या नेत्याचे तिकीट कापले
भाजपने जामनगर उत्तरमधून भारतीय क्रिकेटपटू आणि जामनगरचा रहिवासी असलेल्या रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. रिवाबा यांना राजकारणाचा किंवा निवडणूक लढविण्याचा कोणताही पूर्व अनुभव नाही. विशेष म्हणजे, रिवाबा यांच्यासाठी भाजपने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह यांचे तिकीट कापले आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान
गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. मागील २७ वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"