भारतीय सैन्यातून निवृत्त होताच मुलीसोबत दिली परीक्षा; बाप अन् लेक एकाचवेळी झाले अकाउंटंट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:01 PM2024-01-03T18:01:15+5:302024-01-03T18:01:31+5:30
सुलतानपूर येथील बाप-लेकीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील बाप-लेकीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या वडिलांनी निवृत्तीनंतर लेकीसोबत अभ्यास केला अन् अकाउंटंट होण्याचा मान पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे संबंधित वडील आणि त्यांची मुलगी दोघेही एकाचवेळी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. या बाप-लेकीच्या जोडीची सर्वत्र चर्चा रंगली असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सुलतानपूर येथील बल्दीराय परिसरातील तिवारी गावातील रवींद्र त्रिपाठी हे २०१९ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. देशसेवा केल्यानंतर ते इथेच थांबले नाहीत. निवृत्तीनंतर त्यांनी मुलगी प्रिया त्रिपाठीसोबत बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करायला सुरूवात केली. देशसेवा केल्यानंतर आता समाजसेवेचीही संधी मिळाली असल्याचे रवींद्र त्रिपाठी सांगतात. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी रवींद्र त्रिपाठी हे ५ मार्च १९९१ रोजी सैन्यात भरती झाले होते.
२८ वर्ष देशसेवा अन् आता नवा अध्याय
दरम्यान, भारतीय लष्करात २८ वर्षांच्या सेवेनंतर पाच वर्षांपूर्वी सुभेदार पदावरून निवृत्त झालेले रवींद्र गावाकडे परतले नाहीत. त्यांनी मुलगी प्रिया त्रिपाठी आणि मुलगा दीपेंद्र त्रिपाठी यांच्यासह लखनौमध्ये राहणे पसंत केले आणि बँकिंग क्षेत्रात नशीब आजमवण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी आपल्या मुलीसह एसबीआय पीओची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली परंतु मेन्समध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांची उत्तर प्रदेश पोलिसात उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. पीटीएस मुरादाबादमधील प्रशिक्षणासाठी नियुक्ती पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्राप्त झाले होते. मात्र, ते कुटुंबासोबत राहत असल्यामुळे तिथे रुजू झाले नाहीत. याच कालावधीत त्यांचा मुलगा दीपेंद्रची पोस्ट ऑफिसमध्ये निवड झाली. शनिवारी परीक्षेच्या निकालात रवींद्र यांच्या नावासह त्यांच्या मुलीच्या नावाची नोंद होती. त्यामुळे आता ते आपल्या मुलीसोबत अकाउंटंट म्हणूनही काम करणार आहे.
"तरूणांनी मोबाईल सोडून पुस्तकाशी मैत्री करावी"
समाजासमोर एक आदर्श ठेवल्यानंतर रवींद्र त्रिपाठी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी तरूणांना सल्ला दिला की, मी आधी देशाची सेवा केली, आता समाजाची सेवा करणार आहे. समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो. त्यामुळे मी सांगेन की, तरुणांनी मोबाईलऐवजी पुस्तकांशी मैत्री करावी.