CoronaVirus: “देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही”; रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 12:35 PM2021-05-18T12:35:26+5:302021-05-18T12:37:24+5:30

CoronaVirus: ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

ravish kumar criticized centre modi govt over corona vaccination | CoronaVirus: “देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही”; रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र

CoronaVirus: “देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही”; रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र

Next
ठळक मुद्देदेशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाहीरवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्रलसीकरणावरून केंद्र सरकारवर साधला निशाणा

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. लसींच्या तुटवड्यावरून विरोधक सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. (ravish kumar criticized centre modi govt over corona vaccination)

रवीश कुमार यांनी फेसबुकवर देशातील कोरोना लसीकरणासंदर्भात एक पोस्ट लिहून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, राज्यसभेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले आहे की, दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतातून कोरोना लसींचे डोस पाठवण्यात आले आहेत. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही

दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतातून कोरोना लसींचे डोस परदेशात पाठवण्यात आले. जेणेकरून तेथून येणारे नागरिक भारतात आल्यावर कोरोनाचा फैलाव होऊ नये. याचाच अर्थ केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिक चिंता होती. त्यासाठीच एक कोटी कोरोना लसी पाठवण्यात आल्या. यावर हसावं की रडावं हेच समजत नाही. आता सत्य बाहेर पडू लागले, तेव्हा सर्व लसी निर्यात केलेल्या नाहीत, अशी सारवासरव केंद्र सरकार करत आहे, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था ‘राम भरोसे’; हायकोर्टाने योगी सरकारला सुनावले

सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?

यापूर्वीही रवीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या अहवालानुसार, केवळ एप्रिल महिन्यात ३४ लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकरी गेलेल्यांच्या घरी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, अशातच उपचारांचा खर्च करण्याबाबत त्यांचा आत्मविश्वास ढासळला असेल. कारण अशा परिस्थितीत कोणीही मदत करत नाही आणि बँकेकडूनही सूट मिळत नाही. नागरिकांना आता काहीच नकोय, असे सरकारने मान्य केले आहे का? कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते? हे अतिशय खेदजनक आहे, असे खंत रवीश कुमार यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. 

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 
 

Web Title: ravish kumar criticized centre modi govt over corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.