स्टिंग आॅपरेशनबाबत रावत यांची सीबीआयसमक्ष हजेरी
By admin | Published: May 25, 2016 01:05 AM2016-05-25T01:05:45+5:302016-05-25T01:05:45+5:30
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांची मंगळवारी सीबीआयने आमदारांना लाच देऊ केल्यासंबंधी स्टिंग आॅपरेशनबाबत चौकशी केली.
नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांची मंगळवारी सीबीआयने आमदारांना लाच देऊ केल्यासंबंधी स्टिंग आॅपरेशनबाबत चौकशी केली.
रावत आणि त्यांचे काही समर्थक आमदार सकाळी ११ वाजता सीबीआयच्या मुख्यालयात हजर झाले होते. सीबीआयने रावत यांना संबंधित वादग्रस्त सीडीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले. राष्ट्रपती राजवटीच्या काळात स्टिंग प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करण्याचा आदेश देण्यात आला होता. दरम्यान, रावत यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदी आरूढ होताच सीबीआयला तपासाची परवानगी देणारी अधिसूचना मागे घेतली होती. सीबीआयने मात्र ही अधिसूचना फेटाळत पूर्वीच्याच आदेशानुसार काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. रावत यांनी सीबीआय चौकशीविरुद्ध दाद मागितली असता उत्तराखंड उच्च न्यायालयाने ही प्रक्रिया रोखण्यास नकार दिला. सीबीआयने २९ एप्रिल रोजी प्राथमिक चौकशीची नोंद केली होती. (वृत्तसंस्था)