RBIनं रेपो रेटमध्ये केली कपात, स्वस्त होणार गृहकर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 03:03 PM2017-08-02T15:03:39+5:302017-08-02T17:23:28+5:30
आरबीआयनं रेपो रेटमध्ये चौथ्यांदा कपात करत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
नवी दिल्ली, दि. 2 - आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात करत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं आता गृहकर्ज स्वस्त होणार आहेत. आरबीआयचे रेपो रेट 6.25 टक्क्यांनी कमी होऊन 6 टक्क्यांवर आला. तर रिव्हर्स रेपो रेट कमी होऊन 5.75 टक्के झाला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं सामान्य माणसाच्या डोक्यावरील कर्ज काही प्रमाणात कमी होणार आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे 20 वर्षांसाठी घेतलेल्या 30 लाखांच्या गृहकर्जातील जवळपास 1.14 लाख रुपये कमी होणार आहेत. महागाई दर दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, रेपो रेटमध्ये कपात झाल्यानं आम्हाला आनंद झालाय. तर एक्सिस बँकेचे एमडी आणि सीईओ शिखा शर्मा यांनीही रेपो रेट कमी केल्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील असे म्हटले आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याचा व्याजदर म्हणजे रेपो रेट. तो व्याज दर कमी झाल्यास इतर बँकाही आपल्या व्याज दरात कपात करतात आणि त्याचा फायदा बँकेकडून कर्ज घेणा-या ग्राहकांना मिळतो.
रिव्हर्स रेपो रेट
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने अन्य बँकांकडून पैसे घेते तो दर. रिव्हर्स रेपो रेट वाढल्यास बँकांना फायदा होतो. पण बाजारातील पैशाचा पुरवठा कमी होतो.