RBI Governor: ‘भारताने महागाईचा वाईट काळ मागे सोडला, आता...' RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 08:40 PM2023-03-17T20:40:35+5:302023-03-17T20:40:46+5:30
Shaktikanta Das On Dollar : शक्तिकांत दास यांनी दावा केला की, अमेरिकन डॉलरचा भाव वाढल्याने भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.
Shaktikanta Das On Inflation: देशातील महागाईवरुन विरोधत केंद्रातील भाजप सरकारवर सातत्याने टीका करत असतात. यातच, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशातील महागाईबाबत मोठा दावा केला आहे. 'भारताने महागाईचा वाईट काळ मागे सोडला आहे. आपली अर्थव्यवस्था स्थिर आहे,' असे ते म्हणाले आहेत.
शक्तीकांत दास पुढे म्हणतात, भारताचे परदेशी कर्ज लिमिटमध्ये आहे आणि डॉलरचा भाव वाढल्याने भारतावर कोणतीही अडचण येणार नाही. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गने चालू वर्षात 7% आणि पुढच्या वर्षी 6.5% वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू वर्षातील वाढ जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असेल. डॉलरच्या मूल्यवृद्धीमुळे उच्च परकीय कर्ज असलेल्या देशांना मदत करण्यासाठी RBI गव्हर्नरने G20 द्वारे समन्वित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, G20 देशांनी हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांना युद्धपातळीवर वित्तपुरवठा केला पाहिजे.
अमेरिकेतील आर्थिक संकटावर भाष्य
कोविड-19 महामारी, युक्रेनमधील युद्ध आणि जगभरातील बँकांनी चलनविषयक धोरण कडक केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला अनेक धक्के बसले. अशा परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे आणि ती सर्वात वेगाने वाढणारी असेल अशी अपेक्षा आहे. अमेरिकेत सध्या बँकिंग क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. यावर बोलताना दास म्हणाले की, अमेरिकेत सुरू असलेले बँकिंग संकट हे स्पष्टपणे दर्शवते की, खाजगी क्रिप्टोकरन्सी आर्थिक व्यवस्थेसाठी कसा धोका निर्माण करू शकते. जास्त ठेवी आणि कर्ज वाढ ही बँकिंग व्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
शक्तिकांता दास यांना 'गव्हर्नर ऑफ द इयर' किताब
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांना 2023 सालासाठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जर्नल सेंट्रल बँकिंगने दास यांना हा किताब दिला. RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही 2015 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सेंट्रल बँकिंगने आव्हानात्मक काळात स्थिर नेतृत्व केल्याबद्दल दास यांचे कौतुक केले.