'उर्जित पटेलांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 09:42 AM2018-12-11T09:42:44+5:302018-12-11T09:58:16+5:30
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पटेल यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, सोमवारी (10 डिसेंबर) त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पटेल यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
कार्यकाळ पूर्ण न करणारे दुसरे गव्हर्नर; १९९० नंतर सर्वात कमी काळ सेवा
मनमोहन सिंग यांनी ‘उर्जित पटेल हे एक मोठे अर्थशास्त्री होते. भारतातील आर्थिक संस्था आणि आर्थिक नितींबाबत अत्यंत काळजी असणारे व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा देणं दुर्दैवी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे’ असं म्हटलं आहे. तसेच ‘केंद्राचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीकडे असल्याचा संशय आरबीआयकडून काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता, आता तसं काही घडणार नाही अशी मी अपेक्षा ठेवतो’ असंही सिंग म्हणाले आहेत.
Former PM Manmohan Singh on #UrjitPatel resigns as RBI Governor, "I've known Dr Patel to be an economist of high repute & also someone who cared deeply about India’s financial institutions&economic policy. His sudden resignation is unfortunate & a severe blow to nation’s economy. pic.twitter.com/Q6kzyi3a3k
— ANI (@ANI) December 10, 2018
उर्जित पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, मोदींचे समर्थक म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यकाळ असतानाही उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे, मंगळवारी देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हाती येत आहे. त्यामध्ये भाजपा सरकारच्या विरोधात एक्झिट पोलचे सर्वेक्षण आहे. त्यामुळे उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिले जात असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर, मोदी सरकारसोबतच्या वादामुळेच अखेर त्यांनी राजीनामा दिल्याच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत. दरम्यान, यापूर्वी भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या पदासाठी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. राजन यांच्या निर्णयानंतरही देशभरात खळबळ उडाली होती. तर, उद्योगजगताने राजन यांच्या निर्णयामुळे देशाचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया त्यावेळी नोंदवली होती.