नोटाबंदीवर आरबीआयनं केला मोठा खुलासा
By admin | Published: January 10, 2017 01:28 PM2017-01-10T13:28:06+5:302017-01-10T13:28:06+5:30
मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयनं मोठा खुलासा केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयनं मोठा खुलासा केला आहे. नोटाबंदीवर सुरुवातीला काहीशी मवाळ भूमिका घेणारी आरबीआय दिवसेंदिवस कठोर होताना दिसत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारनं एक दिवस आधी कल्पना दिल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. पहिल्यांदा नोटाबंदीचा निर्णय हा आरबीआयचा असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आरबीआयनं दिलेल्या 7 पानांच्या दस्तावेजातून हे उघड झालं आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या 3 समस्यांना लगाम घालण्यासाठी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घालण्याचा सरकारनं प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात बनावट नोटा, दहशतवाद्यांना मिळणारा निधी, काळा पैशाचा उल्लेख आहे, असं या दस्तावेजात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, नोटाबंदीच्या एका आठवड्यानंतर राज्यसभेत या विषयावरही चर्चाही झाली. त्यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या बोर्डानं या प्रस्तावाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तो सरकारकडे आला आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली आणि जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली, असं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय आरबीआयनं नव्हे, तर सरकारनेच घेतल्याचे दस्तावेजाच्या माध्यमातून समोर आलं आहे.