नोटाबंदीवरील चर्चा सार्वजनिक करण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार
By Admin | Published: December 26, 2016 12:51 AM2016-12-26T00:51:36+5:302016-12-26T00:51:36+5:30
रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत नोटाबंदीबाबत झालेल्या चर्चेची माहिती आरटीआय अंतर्गत (माहितीचा अधिकार) सार्वजनिक करण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत नोटाबंदीबाबत झालेल्या चर्चेची माहिती आरटीआय अंतर्गत (माहितीचा अधिकार) सार्वजनिक करण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. आरटीआय कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी ही माहिती मागविली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केली आणि जुन्या १००० रुपये व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत नोटाबंदीवर काय चर्चा झाली याची माहिती आरटीआय कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी मागविली होती. पण, आरबीआयने कायद्याच्या ८ (१) (अ) चे कारण देत ही माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, आरबीआयच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे नायक यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी गोपनीयता समजली जाऊ शकते. पण, निर्णयानंतर का? असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीनंतर अनेक नागरिक नगदी टंचाईचा सामना करत आहेत. लोकांना हॉस्पिटलमध्ये पैसे भरताना व अन्य ठिकाणीही अडचणी येत आहेत, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)