मस्तच! ना भिजणार, ना फाटणार; शंभराची नवी नोट किमान सात वर्ष टिकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:28 AM2021-05-30T07:28:54+5:302021-05-30T07:29:17+5:30
वार्निसचे लेपन; रंगरूप मात्र जुन्या नोटेसारखेच
नवी दिल्ली : फाटक्या, भिजक्या नोटांच्या समस्यांमुळे हैराण झालेल्यांना रिझर्व्ह बँक दिलासा देणार आहे. न भिजणारी, न फाटणारी १०० रुपयांची नवी नोट रिझर्व्ह बँक लवकरच चलनात आणणार असून या नोटेचे आयुष्यमानही अधिक असेल. ही नवी नोट अधिक टिकावी म्हणून तिला वार्निसचे लेपन करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. सध्या प्रचलित असलेल्या १०० रुपयांच्या नोटेसारखीच नवी नोट असणार आहे. मात्र, नव्या नोटांवर काही आगळी वैशिष्ट्येही पाहायला मिळतील. रिझर्व्ह बँक १०० रुपयांच्या १ अब्ज नव्या नोटा छापणार आहे. सध्या ही नवी नोट
बनविण्याचे काम प्रयोगावस्थेत आहे. ते यशस्वी झाल्यानंतर १०० रुपयांच्या नव्या नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात येऊन जुन्या नोटा बाद होतील.
लाकडाच्या फर्निचरचे पाणी, तापमान, कीटकांपासून संरक्षण होण्यासाठी त्याला वार्निसचे लेपन करतात. मात्र १०० रुपयांच्या नव्या नोटेला वार्निसचे लेपन करताना नोटेचा मूळ जांभळा रंग बदलण्यात येणार नाही. अशी नोट बनविण्यास केंद्र सरकारने याआधीच रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे.
नव्या नोटेचा आकार १०० च्या जुन्या नोटेसारखाच असणार आहे. नव्या नोटांवरही महात्मा गांधी यांचे छायाचित्र असेल. त्या नोटेचे डिझाइन पूर्वीच्या नोटेसारखेच आहे. मात्र नव्या नोटेचे आयुष्यमान १०० च्या जुन्या नोटेपेक्षा कितीतरी अधिक असेल. नोटा फाटणे किंवा जुन्या दिसणे यातून लोकांना दिलासा मिळू शकणार आहे.
किमान सात वर्षे टिकणार
सध्या चलनात असलेली १०० ची नोट दोन ते पाच वर्षे खराब होत नाही. मात्र, नव्या नोटेचे आयुष्यमान किमान ७ वर्षे असेल. नव्या नोटेला वार्निसचे लेपन असल्याने तिचा छपाई खर्च मात्र वाढणार आहे. यामुळे लोकांनी नोटा फाटण्याच्या चिंतेतून सुटका होणार आहे.
सध्या चलनात असलेल्या १०० रुपयांच्या हजार नोटा छापायला १५७० रुपये खर्च येतो; पण वार्निसचे लेपन केलेल्या १०० रुपयांच्या नोटा छापायला त्यापेक्षा जास्त खर्च येणार आहे.