बनावट नोटा ओळखण्यासाठी RBI देणार BSF जवानांना ट्रेनिंग
By admin | Published: February 12, 2017 03:52 PM2017-02-12T15:52:20+5:302017-02-12T15:52:20+5:30
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(बीएसएफ)च्या जवानांना बनावट नोटा ओळखण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 12 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(बीएसएफ)च्या जवानांना बनावट नोटा ओळखण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान होणा-या बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरापासून सीमेवर 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा लागोपाठ जप्त करण्यात आल्या असून, सुरक्षा एजन्सी आणि गुप्तचर विभागाची झोप उडाली आहे.
सुरक्षा एजन्सीनं पकडलेल्या बनावट नोटांची संख्या चिंताजनक आहे. 2 हजारांच्या अर्ध्याहून अधिक बनावट नोटांवर सिक्युरिटी फिचर्सला कॉपी करण्यात आलं आहे. त्यामुळेच आरबीयआनं जवानांना 2000च्या ख-या नोटा ओळखण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
जवान आणि अधिका-यांनी ख-या नोटा ओळखणं गरजेचं आहे. 2 हजारच्या नव्या नोटेवर 17 सिक्युरिटी फिचर्स आहेत. त्यामुळे बनावट नोटा लवकरात लवकर ओळखल्या जाव्यात. नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारत आणि बांगलादेश सीमेवरील माल्दा आणि मुर्शिदाबादेत बनावट नोटांची तस्करी कमी झाली आहे.
मात्र 2000च्या बनावट नोटा सापडू लागल्यापासून चिंतेत वाढ झाली आहे. माल्दा जिल्ह्याजवळील केंद्रीय आणि राज्य पोलिसांच्या एजन्सीनं डिसेंबर 2016 आणि जानेवारीदरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 8 फेब्रुवारीला पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका तरुणाकडून 2 हजार रुपयांच्या 40 बनावट नोटा जप्त करून त्याला अटक केली. 2 हजारच्या जप्त करण्यात आलेल्या नोटांवर वॉटरमार्कसह फीचर्स कॉपी करण्यात आले आहेत. त्यामुळे या नोटा ओळखणं अवघड जातं असल्याचंही बीएसएफच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे.