RBI Vs Government : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल राजीनामा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 12:38 PM2018-10-31T12:38:42+5:302018-10-31T13:00:22+5:30

RBI Vs Government : रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील वाद संपुष्टात येण्याचं नावच घेत नाहीय. या घडामोडींदरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.

RBI Vs Government: Reserve Bank Governor Urjit Patel may resign after rift with government | RBI Vs Government : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल राजीनामा देणार?

RBI Vs Government : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल राजीनामा देणार?

Next

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील वाद संपुष्टात येण्याचं नावच घेत नाहीय. या घडामोडींदरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. नोटाबंदीसह रेपोदर वाढीसंदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आजवर अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने बँकेच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये, असे मत बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनीही एका कार्यक्रमात व्यक्त केले होते. यानंतर केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेतील संबंध ताणले गेले. यामुळे ऊर्जित पटेल हे गव्हर्नरपदी कायम राहतील की नाही, अशी उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

केंद्र सरकार-आरबीआयमधील वाद आणि यादरम्यानच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मंगळवारी (30 ऑक्टोबर) केलेल्या विधानामुळे हा वाद अधिकच चिघळला आहे. अरुण जेटली यांनी एका कार्यक्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर टीका केली. जेटली म्हणाले की, 2008 ते 2014 दरम्यान बँकांकडून मनमानीपणे कर्जेवाटप करण्यात आले. यावेळेस  आरबीआयनं दुर्लक्ष केलं. बँकिंग व्यवस्थेतील बुडीत कर्जाच्या समस्येचं खापरही त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेवर फोडले.

(बँका भरमसाट कर्ज वाटप करत असताना आरबीआयनं दुर्लक्ष केलं- अरुण जेटली)

यादरम्यानच, सरकारकडून आरबीआय अँक्टअंतर्गत 'सेक्शन 7 ' लागू करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अहवालाचा हवाला देत यासंदर्भात ट्विट करत भीती व्यक्त केली आहे. 'जर सरकारकडून सेक्शन 7 लागू करण्यात आले असल्यास, आज बऱ्याच वाईट बातम्या येऊ शकतात', असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. 

(बँकांच्या कामकाजातील ढवळाढवळ बंद करा, अन्यथा... RBIच्या कर्मचारी युनियनचा केंद्राला इशारा)

पी. चिंदबरम यांनी आरबीआय आणि केंद्र सरकारमधील तणावासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करणारे ट्विट केले. 

पी. चिंदबरम यांचे ट्विट :

''अहवालानुसार, केंद्र सरकारनं आरबीआय अॅक्टमधील सेक्शन 7 लागू केले आहे. या अंतर्गत सरकारकडून केंद्रीय बँकांना निर्देश पाठवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर,आज बऱ्याच वाईट बातम्या येऊ शकतात, याची मला भीती वाटत आहे. 

आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना चिंदबरम यांनी मोदी सरकारवर निशाणादेखील साधला आहे. ''1991, 1997, 2008 आणि 2013 या एकाही वर्षात आमच्याकडून सेक्शन 7 लागू करण्यात आले नव्हते. या तरतुदीची आता अंमलबजावणी करण्याची गरजच आहे?, यावरुन अर्थव्यवस्थेसंदर्भात सरकार काही तरी लपवत असल्याचं दिसून येत आहे'', असंही चिंदबरम यांनी म्हटले आहे. 

काय आहे सेक्शन 7?
भारतीय रिझर्व बँक अॅक्टमधील 'सेक्शन 7' द्वारे सरकारला एक विशेष अधिकार मिळतात. आरबीआय अॅक्ट अनुसार, या सेक्शन अंतर्गत सरकारकडून गर्व्हनरला कोणत्याही स्वरुपातील निर्देश दिले जाऊ शकतात. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महत्त्वपूर्ण धोरण लागू करण्याची आवश्यकता वाटल्यास सरकार 'सेक्शन 7' लागू करू शकते.  प्रसार माध्यमांनुसार, सरकारकडून सेक्शन 7 लागू करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या माहितीनुसार, भारतात स्वातंत्र्यानंतर प्रथमच या अॅक्टची अंमलबजावणी करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.

Web Title: RBI Vs Government: Reserve Bank Governor Urjit Patel may resign after rift with government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.