आरसीपी सिंहांनी नितीश कुमारांना दाखवली जागा; म्हणाले- 'ते नापास झाले तेव्हा मी IAS होतो...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:09 PM2022-09-12T18:09:51+5:302022-09-12T18:17:20+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांच्यावर खोचक टीका केली होती, त्याला सिंहांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पाटणा: बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखी तीव्र झाले आहे. आराहमधील कार्यक्रमात आरसीपी सिंह यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'नितीश कुमारांनी माझा दर्जा काढण्याऐवजी स्वतःकडे पाहावे. बिहारमध्ये जेव्हा त्यांचा काहीच दर्जा नव्हता, तेव्हाही आणि आजही मी त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे,' अशी टीका सिंह यांनी केली.
'ते नापास झाले अन् मी IAS'
जनता दल युनायटेड (जेडीयू) चे माजी नेते आणि राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह पुढे म्हणाले की, 'जेव्हा नितीश कुमार काहीच नव्हते आणि तिकिटासाठी फिरायचे, तेव्हा मी 1982 मध्ये IAS झालो होतो, त्यांनी माझा दर्जा काय मोजावा. नितीश कुमार यांनी नौदलाची परीक्षा दिली होती, ते त्यात नापास झाले आणि मी IAS परीक्षेत संपूर्ण भारतात 13वा क्रमांक मिळवला होता.'
आरसीपी सिंह पुढे म्हणतात, 'लोकशाहीच्या या देशात सर्व नागरिक हा सन्मान आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर आरसीपी सिंह म्हणाले की, माझ्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत, सध्या मी कार्यकर्त्यांना भेटत आहे, पुढे काय होईल माहित नाही.' नितीश कुमार पंतप्रधान पदाचा चेहरा बनण्याच्या प्रश्नावर आरसीपी सिंह म्हणतात की, 'ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते दावेदार आहेत. नितीश कुमार स्वत:ला मोठे नेते मानतात, ते इतरांना नेता मानतील की नाही, यात शंका आहे.'
नितीश कुमारांची खोचक टीका
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आरसीपी सिंह यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता ते संतापले. सीएम नितीश कुमार म्हणाले होते की, 'कोणाचेही नाव घेऊ नका, त्यांचा दर्जा काय अन् माझा दर्जा काय. यापुढे माझ्यासमोर त्यांचे नाव घेऊ नका. ते एक आयएएस होते, त्यांना मी खाजगी सचिव बनवले आणि नंतर राजकारणात आणले. मला त्यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका.'