असं आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठीचं RDX, एनआयएच्या आरोपपत्रामधून खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:16 PM2020-08-25T15:16:50+5:302020-08-25T15:28:49+5:30
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यासाठी RDXचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता.
नवी दिल्ली/श्रीनगर - गतवर्षी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यामुळे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. दरम्यान, या हल्ल्यासाठी RDXचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता. मात्र आता पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएने या हल्ल्याबाबतचं ५ हजार पानांचं आरोपपत्र तयार केलं आहे. हे आरोपपत्र आज न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. तसेच या आरोपपत्रामधून अनेक खळबळजनक दावे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रामध्ये पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आणि रौफ अझगर यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. तसेच पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यामधील बसवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे पाकिस्तानमधून आणण्यात आले होते, असे एनआयएच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार आरडीएक्ससह अन्य स्फोटके दहशतवादी पाठीवर लादून घेऊन आले होते. तसेच या प्रकरणातील एक अन्य आरोपी असलेला इक्बाल रादर हा उमर फारुख या दहशतवाद्याला रात्रीच्या अंधारामध्ये नियंत्रण रेषा पार करवून काश्मीर खोऱ्यात घेऊन आला होता. एनआयएला या संदर्भातील व्हिडीओ पुरावे मिळाले आहेत. त्यामध्ये अमावस्येच्या रात्री घुसखोरी करण्याच्या कारस्थानाचा उल्लेख आहे. हा व्हिडीओ एनआयएला उमर फारुखच्या मोबाइलमध्ये मिळाला होता. या फोनमधील माहितीवरून तपास यंत्रणेला दहशतवाद्यांच्या कारस्थानाची माहिती मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले अमोनियम नायट्रेड आणि नायट्रो ग्लिसरिन यासारखे पदार्थ स्थानिक पातळीवर गोळा केले होते. दरम्यान, यातील काही स्फोटके ही दहशतवाद्यांनी काश्मीरमधून ऑनलाइन खरेदी केली होती, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती