‘नीट’च्या ग्रेसमार्कची फेरतपासणी, चार जणांची समिती गठित, नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत १५०० हून अधिक जणांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 05:52 AM2024-06-09T05:52:06+5:302024-06-09T05:52:45+5:30

'NEET' Exam News: नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची फेरतपासणी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण खात्याने चार सदस्यांची एक समिती नेमली आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी दिली.

Re-examination of 'NEET' grace marks, four-member committee formed, more than 1500 candidates benefited in NEET-UG medical entrance exam | ‘नीट’च्या ग्रेसमार्कची फेरतपासणी, चार जणांची समिती गठित, नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत १५०० हून अधिक जणांना फायदा

‘नीट’च्या ग्रेसमार्कची फेरतपासणी, चार जणांची समिती गठित, नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत १५०० हून अधिक जणांना फायदा

 नवी दिल्ली - नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची फेरतपासणी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण खात्याने चार सदस्यांची एक समिती नेमली आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी दिली. या परीक्षेतील गुणवाढीबद्दल अनेक आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेले बदल तसेच परीक्षा केंद्रांमध्ये काही कारणांनी वाया गेलेला वेळ या गोष्टींमुळे दिलेले वाढीव गुण ही विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळण्यामागची काही कारणे आहेत. मात्र नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले नाहीत, असे एनटीएने सांगितले. नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या  देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपने केली आहे, तर या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा काँग्रेसने दावा केला होता.

अन्य परीक्षार्थींना बसणार फटका : काँग्रेस
विविध परीक्षांमध्ये पेपर फुटणे, हेराफेरी, भ्रष्टाचार या गोष्टी घडतात असे काँग्रेसने म्हटले आहे. भाजप युवकांची फसवणूक करत असून, त्यांच्या भविष्याशी खेळत आहे, असा आरोप काँग्रेसने केला. सहा परीक्षा केंद्रांवर काही कारणांनी दिलेला वाया गेल्याने विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले. त्यामुळे त्यांचे गुण वाढले. त्यामुळे अन्य परीक्षार्थींच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा होत आहे. मेघालय, हरयाणातील बहादुरगड, छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बलोध, गुजरातमधील सुरत आणि चंडीगड येथे ती सहा केंद्रे आहेत. 

पुन्हा परीक्षा घेण्याची  विद्यार्थ्यांची मागणी
- नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गुणवाढीमुळे यंदा वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया काहीशी कठीण होणार आहे. निकालामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
- त्यामुळे या परीक्षेचा निकाल रद्द करावा व पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी काही परीक्षार्थींनी केली आहे. नीट-यूजी वैद्यकीय परीक्षा पुन्हा घ्यायची का याचा निर्णय चार सदस्यीय समिती जो अहवाल देईल त्यातील शिफारसींवर अवलंबून राहील, असे एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह म्हणाले. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. '

प्रवेशप्रक्रियेवर परिणाम नाही : एनटीए महासंचालक
वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला. ६७ विद्यार्थ्यांना या परीक्षेत प्रथमश्रेणी मिळाली. त्यात हरयाणातील सहा जणांचा समावेश होता. यंदा या परीक्षेला २४ लाख विद्यार्थी बसले. ही विक्रमी संख्या आहे. एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह म्हणाले की, १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची तपासणीसाठी यूपीएससीचे माजी चेअरमन यांचा समावेश असलेल्या चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ग्रेस मार्क दिल्यामुळे नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पात्रता निकषांवर कोणताही परिणाम झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या फेरतपासणीचा प्रवेशप्रक्रियेवर परिणाम होणार नाही, असेही सुबोधकुमार सिंह म्हणाले.

Web Title: Re-examination of 'NEET' grace marks, four-member committee formed, more than 1500 candidates benefited in NEET-UG medical entrance exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.