Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज; अवघ्या ३ तासांत ५० बेडचं बलून हॉस्पिटल तयार, काय आहे वैशिष्टे?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 02:41 PM2021-09-12T14:41:13+5:302021-09-12T14:45:48+5:30
कंपनीने बलून हॉस्पिटलचं बाहेरील आवरण तयार केले आहे. १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद बलून हॉस्पिटलमध्ये एसीपी सीट्सच्या माध्यमातून पार्टिशन आणि अन्य इंटेरियर काम करण्यात आलं आहे.
बैतूल – मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ५० बेडचं इंफ्लेटेबल हॉस्पिटल उभारलं जात आहे. हे हॉस्पिटल केवळ १० दिवसांत तयार झालं. या हॉस्पिटलचं वैशिष्ट म्हणजे हे फुग्यापासून बनवलं आहे. परंतु यात असणाऱ्या सुविधा एखाद्या खासगी हॉस्पिटललाही मागे टाकतील अशा आहेत. NGO अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या मदतीनं हे हॉस्पिटल तयार करण्यात आलं आहे. दिल्लीतील पीडी मेडिकल कंपनीने हॉस्पिटल बनवलं आहे.
पाणी, फायरप्रूफ असेल हॉस्पिटल
हे हॉस्पिटल बलून टैंटसारखं बनवलं आहे. केवळ गरम हवा भरुन ते कुठेही उभारलं जाऊ शकतं. तसेच हे हॉस्पिटल पूर्णत: पाणी आणि फायर प्रूफ आहे. अवघ्या ३ तासात हे तयार होऊ शकतं. या बलून हॉस्पिटलमध्ये ५० रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. पुढील १० दिवसांत हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महागड्या हॉस्पिटलच्या तुलनेत यात देण्यात आलेल्या सुविधाही जास्त आहेत. जवळपास ८ ICU, १५ ऑक्सिजन बेड आणि २७ सर्वसामान्य बेडचा समावेश आहे.
कंपनी पुढील १० दिवसांत ऑक्सिजन पाइप लाइन सपोर्टवर बेड तयार करणार आहे. स्टँडसह रुग्णांना मिळणारी सुविधाही तयार आहे. हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन एरिया, एग्जामिनेशन हॉल, नर्स, रुग्णांसाठी वॉशरुम आदि सुविधा देण्यात आल्या आहेत. या हॉस्पिटलचे साइट इन्चार्ज रुपेश यांनी सांगितले की, टेंट उभा करण्यासाठी गरम अथवा थंड दोन्ही हवेचा वापर केला जाऊ शकतो. या बलून टेंटवर बाहेरील वेगवान वारे आणि वादळाचा काहीही फरक पडणार नाही. कारण याच्यामध्ये ब्रिकेट आणि वाळूची पोती भरलेली आहेत.
कंपनीने बलून हॉस्पिटलचं बाहेरील आवरण तयार केले आहे. १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद बलून हॉस्पिटलमध्ये एसीपी सीट्सच्या माध्यमातून पार्टिशन आणि अन्य इंटेरियर काम करण्यात आलं आहे. या हॉस्पिटलचं फ्लोर पीडब्लूडी पीआययूने तयार केले आहेत. जिल्हा हॉस्पिटलने हे बलून हॉस्पिटल उभारण्यासाठी जागा दिली. या खास हॉस्पिटलला सीवरेज आणि पाण्याची व्यवस्था नगरपालिकेने केली आहे. डॉक्टर आणि अन्य स्टाफ आरोग्य विभागाकडून उपलब्ध करण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बलून हॉस्पिटलमुळे नवा पर्याय सरकारसमोर तयार झाला आहे.