CoronaVirus: कोरोना संकटात देशानं साद दिल्यास प्रतिसाद द्याल का?; राजन यांचं 'भारतीय' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 07:51 AM2020-04-12T07:51:28+5:302020-04-12T10:34:31+5:30
Coronavirus रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार समितीत निवड
नवी दिल्ली: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून भारतातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. आधीच अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीत असताना आता देशासमोर कोरोनामुळे नवं संकट निर्माण झालं आहे. जगातही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक रघुराम राजन यांचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सापडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतील. यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि कोरोनाच्या संकटावर भाष्य केलं.
भारतात कोरोनाच्या संकटाची तीव्रता वाढत असून अर्थव्यवस्थाही अडचणीत आहे. अशा परिस्थितीवर भारताची मदत कराल का, असा प्रश्न राजन यांना विचारण्यात आला. त्यावर मदतीचं आवाहन केल्यास मी नक्कीच योगदान देईन, असं उत्तर त्यांनी दिलं. ही परिस्थिती बिकट आहे. मी एक भारतीय नागरिक आहे. कोणत्याही भारतीयाला कठीण काळात मदतीसाठी बोलावलं जातं, तेव्हा तो येणारच, असं राजन पुढे म्हणाले.
कोरोना, त्याचा जागतिक आणि आर्थिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर राजन यांनी भाष्य केलं. 'आर्थिक अर्थव्यवस्थेला मंदीचं ग्रहण लागलं आहे. मात्र पुढील वर्षी ही स्थिती सुधारेल. भारतासमोर परकीय चलनातील देवाणघेवाणीचं मोठं आव्हान आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या चलनाची स्थिती चांगली आहे. याचं श्रेय रिझर्व्ह बँकेला जातं आणि यात दुमत असण्याचं कारण नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरलं आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत ही घसरण कमी आहे,' असं राजन म्हणाले.
संकटाच्या काळात विरोधकांना आणि तज्ज्ञांना सोबत घेण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं. स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं आव्हान देशासमोर आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला हवा. केवळ पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या संकटाचा सामना करणं सोपं असणार नाही. त्यामुळे सरकारनं प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं सहकार्य घ्यायला हवं, असा सल्ला राजन यांनी दिला.