राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच मिळणार स्वत:च्या मालकीचे विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 11:45 AM2018-03-13T11:45:31+5:302018-03-13T12:17:09+5:30
दीर्घ प्रवासादरम्यान या विमानाला इंधन भरण्यासाठी उतरावे लागत असे.
नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच स्वत:च्या मालकीचे विमान मिळणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या विमानांमध्ये आवश्यक ते बदल करून 2020 पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
केंद्र सरकारने एअर इंडियाकडून बोईंग 777-300 एक्सेंटेड रेंज या प्रकारातील दोन विमाने विकत घेतली आहेत. सध्या या विमानांमध्ये व्हीआयपी कक्ष, पत्रकार परिषदेसाठीची खोली आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठीचा कक्ष तयार करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय, या विमानात वायफाय आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणाही असेल, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी सरकारमधील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी केंद्राने एअर इंडियाकडून बोईंग-777 हे विमान विकत घेतले होते. मात्र, या दीर्घ प्रवासादरम्यान या विमानाला इंधन भरण्यासाठी उतरावे लागत असे. मात्र, 777-300 एक्सेंटेड रेंज ही दोन्ही विमानं भारत ते अमेरिका हा दीर्घ पल्ल्याचा प्रवास न थांबता करू शकतात.
2006 साली एअर इंडियाकडून एअरोस्पेसला 68 विमाने तयार करण्याची ऑर्डर दिली होती. या खरेदी व्यवहारातील अखेरची तीन विमाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एअर इंडियाला मिळाली होती. त्यापैकी दोन विमाने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत. यामुळे भविष्यात एअर इंडियाला पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विमान राखून ठेवण्याची गरज उरणार नाही.