सन्मान, प्रतिष्ठा राखण्यास सीमा ओलांडण्याची तयारी : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 05:17 AM2023-07-27T05:17:18+5:302023-07-27T05:17:58+5:30
नागरिकांना लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन
द्रास (लडाख) : भारत आपला सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडण्यास तयार आहे, अशी गर्जना करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सामान्य नागरिकांनी अशा स्थितीत सैनिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन केले. रशिया-युक्रेन युद्धाचे उदाहरण देत राजनाथ सिंह म्हणाले की, हे युद्ध एका वर्षाहून अधिक काळ सुरू आहे, कारण नागरिक पुढे आले आहेत आणि युद्धात भाग घेत आहेत.
२४ व्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील युद्ध स्मारकात सिंह बोलत होते. तत्पूर्वी, त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
राजनाथ सिंग यावेळी म्हणाले की, देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. याचा अर्थ नियंत्रण रेषा ओलांडणे असेल तर आम्ही ते करण्यासही तयार आहोत. आम्हाला चिथावणी दिली गेली आणि गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा आमच्या लोकांनी नेहमीच आमच्या जवानांना पाठिंबा दिला आहे.
या युद्धात लढलेल्या अनेकांचे नुकतेच लग्न झाले होते, काहींचे लग्न होणार होते किंवा काही त्यांच्या कुटुंबाचे एकमेव कमावते होते. मात्र, त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, त्यांचे योगदान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही सिंग यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)
कारगिल युद्ध भारतावर लादण्यात आले होते. ज्या वेळी भारत पाकिस्तानसोबतचे प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करत होता, त्या वेळी पाकिस्तानने आमच्या पाठीत खंजिर खुपसला.
- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री