जनरल रावत यांच्या विधानानंतर पाकिस्तानचा संताप; लष्कराकडून थेट युद्धाची भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 09:05 AM2018-09-23T09:05:49+5:302018-09-23T09:08:20+5:30
आम्ही कायम युद्धासाठी सज्ज असल्याची पाकिस्तानची धमकी
नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द झाल्यानंतर आता दोन्ही देशांच्या लष्करांनी एकमेकांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची हत्या करण्यात आल्यानंतर भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. यानंतर आता पाकिस्तानी लष्कराकडूनही भारताला धमकी देण्यात आली आहे. आम्ही एक अण्वस्त्र संपन्न देश असून कायम युद्धासाठी तयार आहोत, असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. यानंतर भारतानं न्यूयॉर्कमध्ये होणारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्वागत केलं. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सज्ज असल्याचंही त्यांनी म्हटलं. यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्करानंही प्रतिक्रिया दिली. आम्ही अण्वस्त्र संपन्न असून कायम युद्धासाठी सज्ज आहोत. पाकिस्तानकडून शांतता राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र या शांततेच्या आवाहनाला कोणीही आमचा कमकुवतपणा समजू नये, असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ मफूर यांनी म्हटलं.
शनिवारी भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली होती. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे. संवाद आणि दहशतवाद एकाचवेळी होऊ शकत नाही, असं रावत म्हणाले होते. 'आमच्या सरकारचं धोरण अतिशय स्पष्ट आहे. पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया रोखाव्यात. पाकिस्तानकडून अतिशय निर्घृणपणे जम्मू काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे,' असं रावत यांनी म्हटलं होतं.