‘माझ्यावरील हल्ल्यामागील खरे गुन्हेगार द्वेष पसरविणारे’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:49 AM2018-08-15T04:49:28+5:302018-08-15T04:49:46+5:30
माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागील खरे गुन्हेगार द्वेषाचे, रक्ताची तहान लागलेले व भीती निर्माण करणारेच आहेत, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी मंगळवारी म्हटले.
नवी दिल्ली : माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागील खरे गुन्हेगार द्वेषाचे, रक्ताची तहान लागलेले व भीती निर्माण करणारेच आहेत, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी मंगळवारी म्हटले. खालिद यांच्यावर सोमवारी हल्ला झाला होता.
खालिद यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये भाजपाच्या प्रवक्त्यांवर आणि प्रसारमाध्यमांवर ठपका ठेवला. खालिद म्हणाले की, या लोकांनी (प्रवक्ते व मीडिया) मला ‘तुकडे तुकडे गँग’चा भाग बनवून टाकले. खालिद यांनी फेसबुकवर ते पत्रकार गौरी लंकेश यांच्यासोबत असल्याचे छायाचित्रही टाकले आहे. लंकेश यांची सप्टेंबर, २०१७ मध्ये हत्या झाली. मला सतत येत असलेल्या धमक्या व गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या पाहता, एखाद्या दिवशी माझ्यावरही बंदूक रोखली जाईल, हे मला माहिती आहे, असे त्यांनी लिहिले. नरेंद्र दाभोळकर, एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे, गौरी लंकेश अशी हत्या झालेल्यांची यादी वाढतच आहे. खालिद म्हणाले की, माझ्यावरील हल्ला हा देशाच्या राजधानीत अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या भागात तोही स्वातंत्र्य दिन दोन दिवसांवर आलेला असताना झालेला आहे. यावरून काही लोकांना सध्याच्या राजवटीत काहीही केले, तरी कशी मोकळीक मिळते हे सिद्ध झाले आहे. माझ्यावरील हल्लेखोर कोण होते, हे मला माहिती नाही, परंतु ते खरेखुरे गुन्हेगार नाहीत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)