आसारामला अटक करणारा दी रिअल हीरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:41 AM2018-04-26T00:41:58+5:302018-04-26T00:41:58+5:30

अटक होऊ नये म्हणून दिले होते आमिष, कारवाईनंतर आली धमक्यांची १६०० पत्रे

The real hero to arrest Asaram | आसारामला अटक करणारा दी रिअल हीरो

आसारामला अटक करणारा दी रिअल हीरो

Next

एक अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांसह २१ आॅगस्ट २0१३ रोजी पोलीस उपायुक्त अजय लांबा यांना जोधपूरमध्ये भेटली आणि त्यांनी आसाराम बापूवर लैंगिक शोषणाचा आरोप करून, गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.

सुरुवातीला मुलगी व तिच्या वडिलांच्या तक्रारीवर माझा विश्वासच बसेना. कोणा एका संताची बदनामी करण्यासाठीचा हा प्रकार असू शकतो, असे मला वाटले. पण त्या मुलीने जोधपूरपासून ३८ किलोमीटरवर असलेल्या मनाई नावाच्या गावातील आसारामच्या आश्रमाचे पूर्ण वर्णनच माझ्यापुढे केले.
तिथेच तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्या ठिकाणी गेल्यावरच तिने केलेले वर्णन बरोबर आहे का, ती म्हणते ती खोली तिथे आहे का, हे लक्षात येईल, असे आम्हाला जाणवले, असे लांबा म्हणाले.

या तक्रारीनंतर मेरळ येथील आणखी एका कुटुंबानेही आमच्याशी संपर्क साधला. त्यांचीही तशाच प्रकारची तक्रार होती. त्यामुळे आम्हाला आसाराम असे काही करीत असल्याची खात्री वाटू लागली. मात्र आसाराम नेमका कुठे आहे, हे आम्हाला माहीत नव्हते. त्यामुळे पोलिसांचे एक पथक इंदूरमधील आश्रमात पाठवण्यात आले. तसेच पत्रकार परिषद घेऊ न आम्ही आसारामचा शोध घेत आहोत, असे जाहीर केले. ते कळताच आसाराम ३१ आॅगस्ट २0१३ रोजी भोपाळ विमानतळावर पोहोचला. तेथून प्रसारमाध्यमांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

मात्र इंदूरच्या आश्रमात आधीपासूनच पोलीस पथक आहे, त्याची माहिती आसारामला नव्हती. त्यामुळेच तो त्या आश्रमात पोहोचला आणि लगेच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांना तसेच अधिकाऱ्यांना दमदाटी करण्याचा, त्यांना विविध आमिष दाखवण्याचा प्रयत्न आसारामने तसेच त्याच्या भक्तांनी केला. अजय लांबा यांना तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. आसारामला अटक केल्यानंतर अजय लांबा यांना धमकीची १६00 पत्रे आली. पण ते धमक्यांना घाबरले नाहीत आणि ते आमिषांना बळीही पडले नाहीत.

 

बलात्कारी ‘साधू’

राम रहीम
आध्यात्मिक गुरू बनून मुली व महिलांचे लैंगिक शोषण करणारे अनेक बाबा भारतात आहेत. आसाराम वा त्याचा मुलगा नारायण साई हे पहिलेच आहेत, असे नव्हे. गेल्या वर्षी न्यायालयाने २0 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेला राम रहीम याच्यावरही बलात्काराचा गुन्हाच सिद्ध झाला होता.

स्वामी परमानंद
तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीतील आश्रमात १३ महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपाखाली स्वामी परमानंद तुरुंगातच आहे. त्याच्यावर एका हत्येचाही आरोप आहे.

भीमानंद महाराज
चित्रकुटच्या चमरोहा गावातील भीमानंद महाराजवर सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप होता. त्याबद्दल त्याला अटकही झाली होती. सुटकेनंतर त्याने स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणून घोषित केले. त्याच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता आहे, असे सांगण्यात येते.

स्वामी नित्यानंद
बंगळुरू-म्हैसूर महामार्गावर ध्यानदीपम नावाचा आश्रम चालवणारा स्वामी नित्यानंद याचे दक्षिण भारतात मोठे प्रस्थ आहे. २0१0 साली त्याची एक सेक्स सीडी सर्वत्र प्रसारित झाली होती. त्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. सध्या तो जामिनावर आहे.

Web Title: The real hero to arrest Asaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.