काँग्रेसची खरी कसोटी विधानसभेवेळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:09 AM2017-08-10T01:09:14+5:302017-08-10T01:13:44+5:30
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातनाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. अहमद पटेल यांनी गुजरातमधून भाजपाला उखडण्याची भाषा मंगळवारी विजयी झाल्यानंतर केली खरी; पण तसे करणे सोपे नाही. कारण त्यांनाच काही प्रमाणात गुजरातेत अंतर्गत विरोध आहे.
- संजीव साबडे
येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाविरोधात काँगे्रस असा सामना रंगला. त्यात अहमद पटेल यांची जागा राखण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असली तरी तब्बल १६ आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याने आता येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची खरी कसोटी लागणार आहे.
गुजरात नाट्याचा पहिला अंक राज्यसभेच्या तीन जागांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मंगळवारी रात्री पाहायला मिळाला. एका जागेसाठी काँग्रेस आणि भाजपातील बड्या नेत्यांनी आपली ‘वकिली’ बुद्धिमत्ता पणाला लावल्याचेही दिसून आले. नाट्य सुरू झाले काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून आणण्याच्या लढाईने. मंगळवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपली मते दाखवल्याबद्दल ती बाद ठरविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने रात्री ११.३० वाजता मान्य केल्यानंतर मतमोजणी होऊ न १२.३० वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते; पण भाजपाने नंतरही आक्षेप घेतले आणि ती रखडली. त्यामुळे निकालास १.४५ वाजले. त्यात पटेल ४४ मते मिळवून विजयी झाल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार धावतच १ वाजून ४२ मिनिटांनी
बाहेर आले आणि मग काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथे फटाक्यांची आतशबाजी आणि मिठाईचे वाटप सुरू केले. त्या वेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांच्या चेहºयावर प्रचंड अस्वस्थता दिसत होती. अहमद पटेल यांनी केलेल्या ‘सत्यमेव जयते’ अशा टिष्ट्वटनंतर विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर पाच मिनिटांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हे दोघे ४६ मते मिळवून निवडून आल्याचे जाहीर झाले. मात्र, भाजपामध्ये उत्साह नव्हता. कारण पटेल जिंकले होते. ते शल्य त्यांच्या चेहºयावर जाणवत होते.
फुटलेली दोन मते बाद ठरविण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सारी कायदेशीर ताकद पणाला लावली. निवडणूक आयोगाने ती बाद ठरवली नसती, तर पहिल्या फेरीत पटेल विजयी झालेच नसते. दोन मते बाद झाली नसती, तर बलवंतसिंह राजपूत यांची मतसंख्या ४0 झाली असती, तर पटेल यांच्या पारड्यात ४२ मते असती. निवडून येण्यासाठी ४४चा कोटा असल्याने मतदारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी घ्यावी लागली असती आणि त्यात राजपूत सहजच विजयी झाले असते. हे लक्षात आल्यानेच काँग्रेसने सारा आटापिटा केला; पण ५१ आमदार असतानाही पटेल यांना त्याहून कमी मते मिळाली. हे काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रवादी, संयुक्त जनता दल व भाजपा बंडखोर यांचे प्रत्येकी एक मत पटेल यांना मिळाले, हे लक्षात घेता, काँग्रेस आमदारांची ४१ मतेच पटेल यांना मिळाली, असे दिसते. ५७ पैकी ६ आमदार आधीच काँग्रेसबाहेर पडलेले आहेत. आता या निवडणुकीच्या माध्यमातून आणखी दहा जण ‘बाहेर’च्या वाटेवर असल्याचे
सिद्ध झाले आहे. ही काँग्रेससाठी डोकेदुखी आहे.