तेलंगणात प्रत्यक्षात ‘स्पेशल २६’

By admin | Published: December 29, 2016 12:48 AM2016-12-29T00:48:23+5:302016-12-29T00:48:23+5:30

सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून पाच जणांनी मुथुट फायनान्समधील ४० किलो सोने पळविल्याची खळबळजनक घटना हैदराबादेत घडली. या सोन्याची किंमत

In reality, 'Special 26' | तेलंगणात प्रत्यक्षात ‘स्पेशल २६’

तेलंगणात प्रत्यक्षात ‘स्पेशल २६’

Next

हैदराबाद : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून पाच जणांनी मुथुट फायनान्समधील ४० किलो सोने पळविल्याची खळबळजनक घटना हैदराबादेत घडली. या सोन्याची किंमत अंदाजे १२ कोटी रुपये एवढी आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली. पोलीस उपायुक्त विश्व प्रसाद यांनी सांगितले की, सकाळी साडेनऊच्या सुमारास हे पाच जण लाल रंगाच्या स्कोर्पिओतून आले. आपण सीबीआयचे आणि आरबीआयचे अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून हे सोने ताब्यात घेतले आणि वाहनातून ते पसार झाले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी ४० किलो सोने आणि एक लाख रुपये रोख पळविले आहेत. येथील कर्मचाऱ्यांकडून आणखी माहिती एकत्रित केली जात आहे.
सायबराबादचे पोलीस आयुक्त संदीप शांडिल्य यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ते म्हणाले की, अनेक नागरिकांनी काळ्याचा पांढरा पैसा करण्यासाठी सोने खरेदी केले आणि ते बँकेत ठेवले असल्याची माहिती मिळत आहे. येथील रेकॉर्ड तपासले असता येथील कर्मचाऱ्यांनीही येथे लॉकर उघडले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांबाबतही संशय बळावला आहे. येथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येणार असून विशेष तपास पथकही स्थापन करण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या चोरट्यांनी पळून जाण्यापूर्वी येथील सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड केली आहे. सीसीटीव्ही रेकॉर्ड आणि हार्ड डिस्क घेऊन हे चोरटे पळून गेले. दरम्यान, या घटनेनंतर मोठ्या संख्येने या बँकेचे ग्राहक येथे दाखल झाले आणि आपले सोने परत करण्याची मागणी केली. दरम्यान, श्वान पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे, तर रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भरदिवसा या फायनान्स कंपनीतून १२ कोटी रुपयांचे सोने पळविल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर येथील मणप्पुरम गोल्ड फायनान्सच्या कार्यालयात भिंतीला भगदाड पाडून दोनच दिवसांपूर्वी चोरट्यांनी ३० किलो सोने व रोख रक्कम पळवून नेली होती. (वृत्तसंस्था)

टीबीझेड आणि स्पेशल २६
या घटनेमुळे पोलिसांसह अनेकांना स्पेशल-२६ या अक्षयक?मारच्या चित्रपटाची आठवण झाली. मुख्य म्हणजे मुंबईतील गिरगावच्या आॅपेरा हाउस भागातील त्रिभुवनदास भिमजी झवेरी ज्वेलर्सवर १९८७ साली याच प्रकारे काही जणांनी दरोडा घातला होता.
एका बसमधून आलेल्या काही जणांनी त्या दुकानात शिरून आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासविले होते आणि दुकानातील सर्व दागिने ताब्यात घेत पोबारा केला होता. ते दरोडेखोर अद्याप सापडले नसून, त्यावरच स्पेशल २६ हा चित्रपट आधारित होता.

Web Title: In reality, 'Special 26'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.