बापरे बाप! 10 हजार पदांसाठी तब्बल 95 लाख 51 हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 08:36 AM2018-11-17T08:36:45+5:302018-11-17T08:45:45+5:30
देशभरात रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 8,619 आणि सब-इंस्पेक्टर पदासाठी 1120 जागा काढण्यात आल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी आत्तापर्यंत 95 लाख 51 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
नवी दिल्ली - बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असून दरवर्षी लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी संपादन करून नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. भारतीयरेल्वेमध्ये सध्या सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येत आहे. 10 हजार जागा रिक्त आहेत मात्र त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या ही चकीत करणारी आहे. 10 हजार जागांसाठी तब्बल 95 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे इतक्या लोकांची परिक्षा नेमकी कशी घ्यायची असा प्रश्न आता रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाला पडला आहे.
रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 8,619 आणि सब-इंस्पेक्टर पदासाठी 1120 जागा काढण्यात आल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी आत्तापर्यंत 95 लाख 51 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यानंतर परिक्षेचे नियोजन करणे मोठे आव्हानात्मक काम होणार आहे. यावर मात करण्यासाठी केंद्रीय संगणकीय सिस्टिम तयार करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये प्रत्येक उमेदवाराला पदाप्रमाणे सिस्टिममध्ये वर्गीकृत केले जाणार आहे. याच आधारावर आता परिक्षा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
देशभरात आरपीएफच्या जवानांचाही डेटाबेस तयार केला जात आहे. पायलट प्रोजेक्टनुसार आजवर उत्तर आणि पूर्व रेल्वेच्या 9 हजार आरपीएसएफचा डेटाबेस तयार झाला आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही मॉनिटरच्या आऊटसोर्सिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉन्स्टेबल पदासाठी महिलांच्या 4216 तर पुरुषांच्या 4403 जागांसाठी एकूण 76.60 लाख अर्ज आले आहेत. तर सब-इंस्पेक्टर पदासाठी महिलांच्या 301 आणि पुरुषांच्या 819 जागांसाठी एकूण 18.91 लाख अर्ज आले आहेत.