बेरोजगारीचं भीषण वास्तव! शवगृहातील कामासाठी आता अभियंते आणि उच्चशिक्षितांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 05:45 AM2021-07-26T05:45:35+5:302021-07-26T05:48:18+5:30
बेराेजगारीचा दंश : ६ जागांसाठी ८ हजार अर्ज
काेलकाता : काेराेना महामारीच्या काळात बेराेजगारीत प्रचंड वाढ झाली. अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. सध्या पश्चिम बंगालमध्ये बेराेजगारीचे एक भीषण वास्तव समाेर आले आहे. सरकारी रुग्णालयात मृतदेहांना सांभाळण्यासाठी प्रयाेगशाळा सहायक पदासाठी अभियंत्यांसह पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत.
काेलकाता येथील नीलरत्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘फाॅरेंसिक मेडिसिन ॲण्ड टाॅक्सिकाॅलाॅजी’ विभागात मृतदेह हाताळण्यासाठी सहायक पदाच्या ६ जागा रिक्त आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले हाेते. त्यासाठी तब्बल ८ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यात १०० अभियंते, ५०० पदव्युत्तर आणि २२०० पदवीधर जणांचा समावेश आहे. यापैकी ८४ महिलांसह ७८४ जणांना १ ऑगस्ट राेजी हाेणाऱ्या लेखी परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
या पदाला ‘डाेम’ असेही ओळखले जाते. त्यासाठी इयत्ता आठवी पास ही पात्रता आहे. तसेच १८ ते ४० वर्षांची वयाेमर्यादा असून १५ हजार रुपये दरमहा वेतन आहे. या पदासाठी प्रथमच उच्चशिक्षित लाेकांनी अर्ज केले आहेत. साधारणत: ‘डाेम’ म्हणून पूर्वीपासून काम करत असलेल्यांचे कुटुंबीय अर्ज करतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.