खरेच ‘हेवीवेट’ शहांचे वजन मोजणार !
By admin | Published: September 2, 2015 11:29 PM2015-09-02T23:29:50+5:302015-09-03T01:00:08+5:30
भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे २१ आॅगस्ट रोजी पाटण्यातील शासकीय अतिथीगृहाच्या लिफ्टमध्ये अडकल्यानंतर राजकीय कटकारस्थानाचा आरोप झाल्याचे पाहता या प्रकरणाची आयोगाने चौकशी सुरू केली
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे २१ आॅगस्ट रोजी पाटण्यातील शासकीय अतिथीगृहाच्या लिफ्टमध्ये अडकल्यानंतर राजकीय कटकारस्थानाचा आरोप झाल्याचे पाहता या प्रकरणाची आयोगाने चौकशी सुरू केली असून शासकीय अतिथीगृहातील लिफ्ट ओव्हरलोड झाली काय? हे तपासण्यासाठी शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खरेच वजनकाट्यावर उभे राहण्याची वेळ येऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत भाजपची प्रचारधुरा सांभाळणाऱ्यांपैकी एक असलेल्या शहा यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ पडली. त्यांचे राजकीय वजन वाढून शासकीय यंत्रणाही त्यांच्या तालावर हलू लागली, मात्र पाटण्यात लिफ्ट अडकून पडल्याने शहा यांची झालेली पंचाईत भाजपच्या जिव्हारी लागली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी जाडजूड शहा यांचे वजन जास्त असल्यामुळेच लिफ्ट अडकल्याचे सांगत चांगलीच टर उडविली. त्यावर प्रतिक्रियाही झडल्या मात्र बिहार सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी आयोग नेमला आहे. त्यामुळे शहा आणि त्यांच्यासोबतचे भाजपचे तीन नेते आणि सुरक्षा अधिकाऱ्याला वजन मोजण्याच्या मशीनवर उभे करीत त्यांचे अधिकृतरीत्या वजन मोजले जाण्याचे संकेत मिळाले आहेत. शहा यांच्यासोबत भुपेंदर यादव, सौदन सिंग, नागेंद्र आणि एक सुरक्षा अधिकारी होता. सीआरपीएफच्या जवानांना अखेर लिफ्टचे दार तोडून या सर्वांना बाहेर काढावे लागले, यात सुमारे ४० मिनिटांचा वेळ गेला. शहा यांच्यासह लिफ्टमध्ये अडकलेल्यांना आणि लिफ्टची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयोग पाचारण करू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)