Reasi Terror Attack : दहशतवाद्यांची आता खैर नाही, रियासी हल्ल्याचा तपास NIA टीम करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:46 AM2024-06-10T11:46:36+5:302024-06-10T11:47:00+5:30
Reasi Terror Attack : आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) रियासी दहशतवादी हल्ल्याच्या तपासात उतरली आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यात बसचालकाला गोळी लागली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. दरम्यान, आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) रियासी दहशतवादी हल्ल्याच्या तपासात उतरली आहे.
एनआयए टीम सोमवारी सकाळी लष्कर आणि स्थानिक पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी आणि घटनास्थळावरील परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी येथे पोहोचली आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर एनआयए फॉरेन्सिक टीमने स्थानिक पोलिसांना विविध प्रकारचे पुरावे गोळा करण्यात मदत केली.
National Investigation Agency (NIA) team has reached at Reasi, J&K to assist police and assess ground situation. Forensic team of the NIA is also trying to aid evidence collection from ground: Sources
— ANI (@ANI) June 10, 2024
9 people lost their lives and 33 were injured in the terror attack. pic.twitter.com/YJ3mY2AOf6
तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये शोध मोहीम सुरू केली. स्टेट डिजास्टर रेस्पॉन्स फोर्स (एसडीआरएफ) देखील रियासीमध्ये पोहोचले असून घटनास्थळाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात शोध मोहिमेत ड्रोनचाही वापर केला जात आहे. संपूर्ण टीम या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात गुंतली आहे.
दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू
या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. बसचालकाला गोळी लागली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. या हल्ल्यात ३३ हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.