'ती' एक ठिणगी पडली अन् अमिताभ-अमरसिंह यांची 'जय-वीरू'सारखी जिगरी दोस्ती तुटली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:10 IST2020-02-19T11:47:59+5:302020-02-19T12:10:17+5:30
आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे तुटली अमिताभ आणि अमरसिंह यांची मैत्री

'ती' एक ठिणगी पडली अन् अमिताभ-अमरसिंह यांची 'जय-वीरू'सारखी जिगरी दोस्ती तुटली!
मुंबई: कधीकाळी अमिताभ बच्चन यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांनी काल संपूर्ण बच्चन कुटुंबाची माफी मागितली. गेल्या काही वर्षांपासून सिंह वारंवार बच्चन कुटुंबावर टीका करत होते. त्यामुळे अनेकदा सिंह विरुद्ध बच्चन कुटुंब असा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर तब्बल आठ वर्षांनंतर सिंह यांनी त्यांच्या वर्तणुकीबद्दल क्षमा मागितली.
सिंह आणि बच्चन कुटुंबाचा वाद अतिशय जुना आहे. मात्र त्याहीपेक्षा जुनी आहे त्यांची मैत्री. कधीकाळी सिंह आणि बच्चन कुटुंबीयांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. मात्र एका वादामुळे सिंह आणि बच्चन यांच्यात दरी निर्माण झाली. खुद्द सिंह यांनी एका मुलाखतीत वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली, यावर भाष्य केलं होतं. २०१२ मध्ये अनिल अंबानी यांच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अमर सिंह आणि जया बच्चन यांचा वाद झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंब एकमेकांपासून दूर गेली.
जया बच्चन यांच्यासोबत झालेल्या वादात अमिताभ यांनी आपली बाजू घ्यावी, असं अमर सिंह यांना वाटत होतं. मात्र अमिताभ यांनी जया यांची बाजू घेतली. ही गोष्ट अमर सिंह यांना खटकली. त्यामुळे नाराज झालेले अमर सिंह वारंवार अमिताभ यांच्या कुटुंबावर तोंडसुख घेऊ लागले. बच्चन कुटुंबात वाद असल्याचं, अमिताभ अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे ते उघडपणे म्हणू लागले.
बच्चन कुटुंबानं अमर सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं कायम टाळलं. अमिताभ यांनी फक्त एकदा यावर भाष्य केलं. अमर सिंह माझे मित्र आहेत आणि त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, अशा मोजक्या शब्दांत अमिताभ या वादावर व्यक्त झाले. अखेर आठ वर्षांनंतर सिंह यांनी अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागितली. सध्या अमर सिंह यांच्यावर सिंगापूरमधल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथून त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबीयांची क्षमा मागितली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका
तरुण शेतकऱ्यांना मोदींचं गिफ्ट! व्यवसायासाठी सरकार देणार 3.75 लाख रुपये, असा घ्या फायदा...
भारतातल्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; यंदा मिळणार 'इतकी' पगारवाढ
Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
७३ हजार लोकांना संसर्ग; कोरोनाचे १९०० बळी