...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 08:53 AM2020-05-11T08:53:27+5:302020-05-11T08:58:16+5:30
हवाई दलाचं अंतर्गत सर्वेक्षण; जवानांनी सांगितली सेवा सोडण्यामागील कारणं
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलातील बरेचसे जवान सेवेतून बाहेर पडत असल्याचं वृत्त आहे. एका अंतर्गत सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. काम करण्यास पोषक वातावरण नसल्यानं हवाई दलातले जवान त्यांच्या सेवेला पूर्णविराम देत असल्याचं सर्वेक्षण सांगतं. स्टेशन कमांडर, कमांडिंग अधिकारी यांच्यामध्ये या आशयाचं एक पत्र फिरत असल्याचं वृत्त 'द ट्रिब्यून'नं दिलं आहे.
हवाई दलातील कर्मचारी सेवेमधून बाहेर पडू इच्छितात का, त्यामागची कारणं काय, याबद्दल दोन वर्ष सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानंतर याबद्दलचं एक पत्र हवाई दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये फिरत आहे. काम करण्यासाठी उपयुक्त वातावरण मिळत नसल्यानं हवाई दलाचे ३२ टक्के जवान २० वर्षांनंतर सेवा सोडतात, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे हवाई दलाची चिंता वाढली आहे.
हवाई दलातील सेवा सोडण्यामागे आणखीही काही महत्त्वाची कारणं आहेत. सामान्य नागरी जीवनात चांगले पर्याय मिळत असल्यानंदेखील अनेक जवान हवाई दलाला रामराम करतात. नागरी जीवनात चांगल्या संधी मिळत नसल्यानं हवाई दल सोडणाऱ्यांचं प्रमाण २५ टक्क्यांच्या घरात आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधीचा अभाव (१७ टक्के), कमी वेतन (७ टक्के) अशीदेखील कारणं जवानांना सांगितली आहेत.
गेल्या पाच वर्षांत हवाई दलातल्या ४५ टक्के जवानांनी २० वर्षांच्या सेवेनंतर करारपत्रातील सेवा सोडण्याचा मार्ग निवडला. आपली सेवा कायम ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असूनही जवानांनी सेवा सोडण्यास पसंती दिल्याची आकडेवारी हवाई दलानं दिली. 'प्रशिक्षित आणि अनुभवी मानवी संसाधनं गमावणं हवाई दलाच्या दृष्टीनं चिंताजनक आहे. हे रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं गरजेचं आहे. हवाई दलाचे जवान अशाच प्रकारे लवकर सेवेतून बाहेर पडू लागल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होईल,' असा मजकूर हवाई दलाच्या पत्रात आहे.
पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
गिलगिट-बाल्टिस्तानवर भारताच्या 'मास्टरस्ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज