कराचीत पुन्हा दहशतवादी हल्ला
By admin | Published: June 10, 2014 10:40 PM2014-06-10T22:40:41+5:302014-06-11T00:10:33+5:30
तालिबानच्या दहशतवाद्यांनी कराची विमानतळाजवळ मंगळवारी पुन्हा हल्ला केला. मात्र, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्याने ते पळून गेले.
कराची विमानतळाजवळ पुन्हा तालिबानींचा हल्ला
प्राणहानी नाही: प्रतिकार होताच दहशतवादी फरार
कराची : तालिबानच्या दहशतवाद्यांनी कराची विमानतळाजवळ मंगळवारी पुन्हा हल्ला केला. मात्र, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्याने ते पळून गेले. कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यास ३२ तासही उलटले नसताना पुन्हा हल्ला झाला. यामुळे शहरातील लोक धास्तावून गेले आहेत. विमानतळावरील हल्ल्यात ४० जणांचा बळी गेला होता.
विमानतळाजवळील एअरपोर्ट सेक्युरिटी फोर्स अकॅडमीतील (एएसएफ) एका प्रशिक्षण केंद्रास दहशतवाद्यांनी ताज्या हल्ल्यात लक्ष्य बनविले. मात्र, त्यांना सुरक्षा कडे तोडता आले नाही. सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरानंतर ते नजीकच्या रहिवासी भागामध्ये पळून गेले.
तालिबानने या दुसर्या हल्ल्याचीही जबाबदारी स्वीकारली आहे. तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या मोहंमद गटाच्या ओमर खुरसानी याने टिष्ट्वटर अकाउंटवर आमच्या गटाने हा दुसरा हल्ला केल्याचे म्हटले आहे.
एएसएफचे प्रवक्ते कर्नल ताहिर अली म्हणाले की, सुरक्षा कर्मचार्यांनी आक्रमक पवित्रा घेताच दहशतवादी पळून गेले. पाच दहशतवादी एसएफच्या केंद्रात घुसले असून त्यांची सुरक्षा दलासोबत चकमक सुरू असल्याचे वृत्त आले होते. मात्र, अली यांनी हे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले, वस्तुस्थिती अशी आहे की, दोन जण दुचाकीवरून सकाळी आमच्या केंद्राच्या एका प्रवेशद्वारावर आले आणि त्यांनी तेथे तैनात दोन महिला अधिकार्यांवर गोळीबार केला. मात्र, आमच्या सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत जागा घेताच त्यांनी नजीकच्या पेहलवान गोथ वस्तीत पळ काढला.
परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणाखाली असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी निमलष्करी दले व पोलिसांनी आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानी लष्करही हेलिकॉप्टरमधून टेहळणी करत आहे, असेही ते म्हणाले.
मंगळवारचा हल्ला झालेल्या भागाचा दहशतवाद्यांनी रविवारच्या हल्ल्यात विमानतळात घुसण्यासाठी वापर केला होता. या हल्ल्यात ४० जण ठार झाले होते. मृतांत निमलष्करी व पोलीस दलाचा प्रत्येकी एक कर्मचारी, ११ विमानतळ सुरक्षारक्षक, १४ नागरी कर्मचारी आणि १० दहशतवाद्यांचा समावेश होता.
विमानोड्डाणे विस्कळीत
दहशतवाद्यांनी सकाळी एएसएफच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केल्यानंतर जिन्ना विमानतळावरील प्रवासी व अभ्यागतांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. परिणामी विमानोड्डाणाचे वेळापत्रक विस्कळीत झाले, असे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.
काही उड्डाणे विस्कळीत झाली तर दुबईला जाणारे एक परदेशी विमान वेळेवर रवाना होऊ शकले नाही. मात्र आता विमानतळ व धावपी सुरक्षा दलाच्या नियंत्रणाखाली असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. (वृत्तसंस्था)